‘अशोक’ कारखान्याला उसाचे पेमेंट करण्याचे आदेश द्या! शेतकरी संघटनेची प्रादेशिक सहसंचालकांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-2021 च्या 1 एप्रिल नंतर गाळपास आलेल्या उसाच्या पहिल्या पेमेंटसह दुसरे पेमेंट किमान 800 रुपये मेट्रीक टनाने करावे, असे आदेश कारखाना व्यवस्थापनास द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, अशोक कारखाना व्यवस्थापन समितीने चालू हंगामातील 1 एप्रिल नंतर गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट गेले तीन महिने उलटूनही अद्याप केलेले नाही. तरी उसदर नियंत्रण कायद्याच्या अधीन राहून ऊस तुटल्यापासून 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना 3 महिने उलटूनही अद्याप ऊस उत्पादकांना पैसे मिळालेले नाहीत. सदर रक्कम व्याजासहित वर्ग करणे कामी आदेश व्हावेत.
कोरोना संकटात अशोक कारखान्याने 3 हजार रुपये ग्राह्य धरून उसाचे दुसरे पेमेंट 800 रुपये टनाने तातडीने बँकेत वर्ग करावे. तसेच मागील दीड महिन्यांपासून कारखान्याला शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यकारी संचालकपदी पूर्णवेळ अधिकारी नाही. कारखान्याने गत हंगामात उत्पादकांची संमतीशिवाय प्रवरा, गणेश, संगमनेर, यूटेक व राहुरी कारखान्याला ऊस दिला. त्यांच्याकडून पेमेंट आले नसल्याने पेमेंट देता येत नाही, असे सांगितले जाते. उत्पादकांनी कामधेनू या नात्याने व्यवस्थापनावर विश्वास ठेवून नोंदी दिल्या. कारखान्याला सदर नोंदीवर गाळप परवाना मिळाला असताना अशोकच्या मिलमध्ये गाळप होणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता इतर कारखान्याना ऊस दिला. तरी प्रादेशिक सहसंचालक यांनी थकीत उसाचे पहिले पेमेंट व झालेल्या गाळपाचे 800 रुपये दुसरे पेमेंट होणे कामी आदेश द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अनिल औताडे, युवराज जगताप यांनी केली आहे.