संगमनेर रोटरीतर्फे राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपण समाजासाठी देणे लागतो या भावनेतून संगमनेर रोटरी क्लब वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्रबांधणीच्या कामात मोलाची साथ देणार्‍या प्रयोगशील शिक्षकांचा सन्मान केला जावा, त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्याप्रकारे करता यावे यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी संगमनेर तालुक्यातील 11 शिक्षकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांची घोषणा शिक्षक दिनाच्या दिवशी करण्यात आली असून रविवार दि. 12 सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण रोटरी नेत्र रुग्णालय येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नंदूरबार येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, नगरविकास विभाग मंत्रालय मुंबईचे उपसचिव विजय चौधरी, संगमनेर रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, सचिव हृषीकेश मोढे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार देताना शिक्षकांचे शैक्षणिक कार्य, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान, मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांनी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेण्यात आल्याची माहिती प्रकल्प प्रमुख नरेंद्र चांडक व सुनील घुले यांनी दिली.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये कैलास पवार (संगमनेर-गटशिक्षणाधिकारी), शैलजा फटांगरे (मुख्याध्यापिका-आनंदवन विद्यालय घुलेवाडी), पांडुरंग गोसावी (मुख्याध्यापक-जि.प.प्रा.शाळा कौठे कमळेश्वर), दत्तू आव्हाड (उपाध्यापक-नगरपालिका शाळा क्र.1, संगमनेर), शायदा शेख (उपाध्यापक-जि.प.प्रा.शाळा साकूर), उमेश काळे (उपाध्यापक-जि.प.प्रा.शाळा, कासारा दुमाला), स्वाती भोर (उपाध्यापक-जि.प.प्रा.शाळा बोटा), संदीप पोखरकर (उपाध्यापक-जि.प.प्रा.शाळा, तळेगाव), प्रीती खालकर (उपाध्यापक-जि.प.प्रा.शाळा, रहिमपूर बंधारा), बाळासाहेब भागवत (जि.प.प्रा.शाळा, पिंपळगाव माथा), योगिता वडनेरे (जि.प.प्रा.शाळा गुंजाळमळा, निमज) आदिंचा समावेश आहे.

Visits: 176 Today: 1 Total: 1959838

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *