नन्सना रेल्वेमधून उतरवून दिल्याच्या घटनेचा निषेध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
धर्मांतराबाबत शंका व्यक्त करून नन्सना रेल्वेमधून उतरविण्याच्या घटनेचा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करून परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पाठविलेल्या निवेदनात संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, 19 मार्च रोजी हरिद्वारहून पुरी (ओडिसा) जाणार्‍या उत्कल एक्सप्रेसमधून दोन नन्स् व दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना झांशी रेल्वे स्थानकावर प्रवास करणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उतरविले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शंका व्यक्त केली की, दोन विद्यार्थिनींना धर्मांतर करण्यासाठी घेऊन जात आहे. त्यांनी सिस्टरांना कोणाशी तरी काहीतरी बोलताना ऐकले. परंतु त्या बोलण्याचा त्यांनी वेगळाच अर्थ घेऊन आरपीएफकडे केलेल्या तक्रारीनंतर आरपीएफने केलेल्या चौकशी अंती ही बाब खोटी ठरली आहे. अशाप्रकारे देशात ख्रिश्चन समाजाविषयी गैरसमजातून होत असलेले प्रकार भयानक असून, ख्रिस्ती धर्मामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार होत आहे. या प्रकारामुळे देशातील तमाम ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या असून, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. येणार्‍या काळात हे प्रकार थांबले नाही तर ख्रिस्ती समाजालाही येणार्‍या काळात दिशा निश्चित करावी लागेल. अभाविपच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य अतिशय निंदनीय असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर, उपाध्यक्ष अ‍ॅड.सिरील दारा, प्रा.बाबा खरात, अविनाश काळे, सुवर्णालता कदम, माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, अन्तोन भोसले आदिंनी केली आहे.

Visits: 140 Today: 1 Total: 1849662

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *