सोमवारपासून संगमनेरचे शासकीय ‘कोविड रुग्णालय’ होणार सुरु! संगमनेर तालुक्यातील गरजू कोविड बाधितांना मिळणार मोफत उपचारांची सुविधा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडचा प्रादुर्भाव वाढलेल्या काळात संगमनेर व अकोले तालुक्यातील कोविड बाधितांसाठी वरदान ठरलेले घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील ‘कोविड आरोग्य केंद्र’ अखेर पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेवून तेथील बंद असलेले कोविड आरोग्य केंद्रही सुरू करण्याचा निर्णय घेतला असून संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरमधील केंद्रही सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनुष्यबळाचा अभाव दूर करुन येत्या सोमवारपासून घुलेवाडीतील कोविड आरोग्य केंद्र सुरू केले जाणार असून सुरुवातीला 65 रुग्णांची येथे व्यवस्था होईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी दिली. बंद असलेले घुलेवाडीतील कोविड आरोग्य केंद्र सुरू करावे यासाठी दैनिक नायकसह काही माध्यमांनी शुक्रवारच्या अंकात जिल्हाधिकार्यांचे लक्ष्य केंद्रीत केले होते.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने सर्वसामान्य रुग्णांचे उपचारांसाठी हाल होवू लागले आहेत. शासनाने कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तालुकास्तरावरील कोविड आरोग्य केंद्र बंद करण्याचा निर्णय घेवून केवळ जिल्हा रुग्णालयात कोविड उपचार सुरू ठेवले होते. मात्र मार्चमध्ये कोविडच्या संक्रमणात पुन्हा वाढ झाल्याने आणि संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत असल्याने खासगी रुग्णालये पुन्हा गजबजली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नसल्याने अनेक गोरगरीब रुग्णांना उपचारांसाठी सावकारांचे उंबरठे झिझवण्याची वेळ आली होती.
या स्थितीबाबत प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी दैनिक नायकसह अन्य एका माध्यमाने शुक्रवारच्या अंकात सविस्तर वृत्तप्रपंच मांडला. योगायोगाने शुक्रवारीच कोविड आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह संगमनेरात आले होते. यावेळी त्यांनी संगमनेरातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाबाबत संपूर्ण माहिती घेतल्यानंतर उपाययोजनांबाबत आणि कारवाईबाबत अधिकार्यांना आदेशित केले. त्यासोबतच मध्यंतरीच्या काळात कोविडचे संक्रमण संथ झाल्यानंतर बंद करण्यात आलेली जिल्ह्यातील कोविड आरोग्य केंद्रही तालुकानिहाय आढावा घेवून सुरु करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यानुसार संगमनेरातील घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्रासह श्रीरामपूरातील कोविड आरोग्य केंद्रही सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिली. त्यासोबतच या केंद्रांवर लागणार्या औषधांचा पुरवठाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी भोसले यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले.
येत्या सोमवारपर्यंत (ता.22) संगमनेरातील शासकीय कोविड आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. याबाबत तेथील वैद्यकीय अधिकारी आणि कोविड संक्रमणाच्या संपूर्ण कालावधीत महत्त्वाची भूमिका बजावणार्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांचेशी संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली. शुक्रवारी सायंकाळी सदरचे आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची जमवाजमव करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांत यासर्व गोष्टींची पूर्तता करुन सोमवारपासून सुरुवातीला 65 रुग्णांची सोय होईल इतक्या सुविधा सुरू केल्या जाणार असून काही दिवसांत ही क्षमता 95 रुग्णांपर्यंत वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरचे कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाल्याने संगमनेरातील गोरगरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यावेळची देश आणि राज्याची स्थिती, शासनाकडून मिळत असलेला तुटपुंजा निधी आणि औषधे या सर्व गोष्टी आधीच हेरुन प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्या नेतृत्त्वाखाली इंन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन अधीक्षक डॉ.भास्कर भंवर, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया आदिंसह ‘संगमनेर सहाय्यता निधी’ ही लोकसहभागाची अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरवून संगमनेरात सुसज्ज असे ‘कोविड आरोग्य केंद्र’ सुरू केले. नामदार बाळासाहेब थोरात, डॉ.हर्षल तांबे यांनी वेळोवेळी या रुग्णालयाला आवश्यक ती मदत पोहोचती केल्याने इतक्या मोठ्या संक्रमणातही संगमनेरकरांना योग्य उपचार मिळाले. आता ते पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने संगमनेर तालुक्यातील गोरगरीब कोविड बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.