हजारावर पार्थिवांवर अंत्यसंस्कार करणार्या अवलियाचे निधन! सामाजिक कार्यकर्ते अशोक भुतडा यांच्या निधनाने संगमनेर शोकसागरात बुडाले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सतत चर्चेत असलेले, आजवर शेकडो मृतांच्या अंत्यविधीचे सोपस्कार उरकणारे, आपल्या रोखठोक शब्दांसाठी संपूर्ण शहराला परिचित असलेले, संगमनेरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक जयनारायण भुतडा (वय 65) यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात मृत्यूच्या वार्तेने अवघ्या शहरात शोककळा पसरली. बाजारपेठेतील व्यापार्यांनी बाजारचा दिवस असूनही आज सकाळपासूनच व्यवहार बंद ठेवून महान कार्यकर्ता म्हणून ठसा उमटवलेल्या या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहिली तर संगमनेर नगरपालिकेने गेल्या अनेक दिवसांपासून नूतनीकरण सुरु असलेल्या अमरधाममध्येच त्यांचा अंत्यविधी करण्याचा आग्रह धरुन त्यांना श्रद्धांजली वाहीली.

संगमनेरच्या जुन्या बाजारपेठेत रंगाचे दुकान चालविणारे अशोक भुतडा माहिती नाहीत अशी व्यक्ती संगमनेरात अभावानेच आढळेल अशी त्यांची ख्याती होती. समाजातील कोणाच्याही घरात निधन झाल्याचे समजताच ते थेट अमरधाममध्ये पोहोचत आणि सरण रचण्यापासून ते दुसर्या दिवशी सावडण्याचा विधर आटोपण्यापर्यंत ते त्या कुटुंबासोबत उभे राहत. आजवर संगमनेर व परिसरातील हजारावर पार्थिवाचे अंत्यसंस्कार घडवण्यात त्यांचा सहभाग राहीला आहे. कोणत्याही अंत्यविधीला अशोक भुतडांचा आवाज नाही असे क्वचितच घडत असत.

केवळ सरण रचण्यापुरती त्यांची साथ नसत, तर त्यानंतर देहाला भडाग्नी देण्याचा कार्यक्रम असो, अथवा पाणी देण्याचा, सावडण्याची उद्घोषणा असो अथवा श्रद्धांजलीसाठी नावांचा पुकारा अशोकराव आघाडीवरच असत. मृताच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी शेकडोंच्या उपस्थितीतही खणखणीत आवाजात गीतेचे श्लोक म्हणणारे, सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना म्हणणार्या अशोकरावांविषयी संगमनेरातील सर्वच समाजांमध्ये मोठा आदर होता. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी संलग्न असलेल्या अशोकरावांनी युवक बिरादरी, सर्वोदय पतसंस्था, बाजारपेठ व्यापारी मंडळ, व्यापारी असोसिएशन, संगमनेर मर्चंटस् बँक, नगरपालिका, रिमांड होम अशा विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून समाजासाठी काम केले.

महिन्याभरापूर्वी त्यांना कोविडची लागण झाली होती. त्यातून सावरल्यानंतर अशक्तपणामुळे त्यांच्यावर काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वी घरीही सोडण्यात आले होते. मात्र त्यातून सावरत असतांनाच आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच संगमनेरच्या या अवलियाची प्राणज्योत मालवली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्यावर संगमनेरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा चाहतावर्ग उपस्थित होता.

आजवर शेकडो पार्थिवांवर शास्त्रोक्त अंत्यसंस्कार करणार्या अशोक भुतडा यांच्या निधनाने शोकाकूल झालेल्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी सध्या नूतनीकरणामुळे बंद असलेल्या संगमनेरच्या अमरधाममध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सकाळीच अमरधाममधील मुख्य चौथर्यांची सफाई करण्यात आली होती. शेकडो जणांना शास्त्रोक्त अंत्यसंस्काराचा आग्रह धरणार्या अशोकरावांनाही त्याच पद्धतीने अखेरचा निरोप दिला जावा अशी संगमनेरकरांची भावना असल्याची भावनिक प्रतिक्रिया यावेळी दुर्गा तांबे यांनी दिली.

हजारांवर ज्ञात-अज्ञातांना शास्त्रोक्त अंत्यसंस्कार देणारा अवलिया अशी ओळख असलेल्या अशोकराव भुतडा यांचे महानकार्य लक्षात घेवून संगमनेर नगरपालिकेने नूतनीकरण सुरु असलेल्या संगमनेरच्या अमरधामला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी बाजारपेठ व्यापारी गटाकडून समोर आली असून सोशल माध्यमातून या मागणीला मोठा पाठींबा मिळत आहे. जनभावनेचा आदर करुन आणि अशोकराव भुतडा यांचे कार्य लक्षात घेवून पालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

