राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या..! घटनेची सखोल चौकशी करुन मृत कर्मचार्‍याला न्याय द्यावा : नवगिरे


नायक वृत्तसेवा, राहुरी
गेल्या पंधरवड्यात पोलीस दलातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना आता तरुण आणि कार्यक्षम कर्मचार्‍याच्या आत्महत्येने जिल्हा हादरला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या चाळीस वर्षीय पोलीस कर्मचार्‍याने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली असून या वृत्ताने संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशाल हापसे असे नाव असणार्‍या या कर्मचार्‍याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून या प्रकरणाची चौकशी करुन त्यांना मयत पोलीस कर्मचार्‍यास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी केली आहे.

राहुरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात कार्यरत असलेल्या विशोल हापसे (वय 40, रा.देहरे, ता.नगर) या कर्मचार्‍याने शुक्रवारी विष प्राशन करुन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सुरुवातीला राहुरीतील खासगी व नंतर लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी मागे ठेवलेली नसल्याने त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केला होता. सर्वांशी आदराने बोलण्याची त्यांची पद्धत अनेकांना त्यांच्या जवळ जाण्यास भाग पाडणारी होती. काही महिन्यांपूर्वी श्रीरामपूरहून त्यांची बदली राहुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तेथेही त्यांच्यावर गोपनीय विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. दिवाळीच्या चार दिवसांत नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांशीच प्रेमाने बोलून दिवाळी आनंदात गेल्याचे सांगणार्‍या या कर्मचार्‍याने अचानक मृत्यूला का कवटाळले असा प्रश्न त्यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला पडला आहे.

त्यांच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरीही कामाच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र हा तणाव नेमका कोणाचा होता? यामागे कोणी पुरुष आहे की स्त्री असे वेगवेगळे प्रश्न समोर येत असून मयत पोलीस कर्मचार्‍याच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. अन्यथा या आत्महत्येचा थेट पोलीस कर्मचार्‍यांच्या मानसिकतेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर कर्मचारी सर्वांशी चांगला वागत असल्याने त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने श्रीरामपूर व राहुरी परिसरात शोक पसरला आहे.

विशाल हापसे हे अत्यंत मनमिळावू आणि कार्यतत्पर पोलीस कर्मचारी होते. अचानक त्यांनी आत्महत्या करावी हे कोडे न उलगडणारे आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? कोणाच्या तणावातून त्यांनी आपला जीव देण्याचा निर्णय घेतला अशा सर्व गोष्टींची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. या विषयावर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे लक्ष्य वेधले असून त्यांना त्यांच्या स्तरावरुन चौकशी करुन मयत कर्मचार्‍याला न्याय देण्याची विनंती केली आहे.
बाळासाहेब नवगिरे
जिल्हाध्यक्ष – ग्रामीण पत्रकार संघटना

Visits: 77 Today: 1 Total: 1110901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *