पाचेगावच्या तत्कालिन ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करा! जिल्हा परिषदेसमोर उपोषण करत वंचित बहुजन आघाडीची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पाचेगाव ग्रामपंचायतच्या माजी ग्रामसेवकाने केलेल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांनी या उपोषणाचे नेतृत्व केले.

या उपोषणात डॅनियल देठे, अमोल अभंग, शमूवेल देठे, सुनील राक्षे सहभागी झाले होते. तर या उपोषणाला फिलीप खरात, रमेश राजगिरे यांनी पाठिंबा दिला होता. पाचेगाव गावठाणमधील दलित वस्तीमधील रस्ता व गटारींचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून जिल्हा परिषद फंडातून पाचेगाव-पुनतगाव रस्ता दुरुस्त न करता निधीचे पैसे हडप केले आहेत. पाचेगाव-खिर्डी रस्त्याला बंदिस्त गटार न करता अंतिम प्रमाणपत्र दाखवून 1 लाख 73 हजारांचा भष्ट्राचार केला असून याची देखील चौकशी करण्यात यावी, पाणीपुरवठा व ग्राम निधीमधून जेसीबी खर्च दाखवून तसेच 14 व्या वित्त आयोगातून पथदिवे खांबांची रक्कम जादा दाखवून भष्ट्राचार केला आहे. या सर्व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून माजी ग्रामसेवक व अन्य पदाधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी देखील निवेदनातून केली आहे.

नेवासा पंचायत समिती मार्फत या महिन्याच्या अखेरपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करावी असे लेखी आश्वासन उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार अग्रवाल यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आल्याचे हरीश चक्रनारायण यांनी सांगितले.
![]()
मागासवर्गीयांचा निधी इतर प्रभागांत पाठवला जातो. याबाबत अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या असून दलित वस्तीसाठी आलेल्या निधीचा गैरव्यवहार झाल्यास तीव्र आंदोलन छेडून, याबाबत आपण आवाज उठवणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांनी दिला आहे.
