संगमनेर तालुक्यातील कोविडचे संक्रमण आजही गतीतच! यापुढे तालुक्यातील प्रत्येक विवाह सोहळ्याचे चित्रीकरण केले जाणार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात सुरू असलेला कोविडचा प्रादुर्भाव अजूनही जोमात असल्याचे चित्र आहे. आजही तालुक्यातून 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात शहरातील तब्बल 22 जणांचा समावेश आहे. दररोज वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील कोविड केअर सेंटर्स आणि रुग्णालयेही तुडूंब झाली आहेत. संक्रमणाकडे दुर्लक्ष करुन झालेले सोहळे आणि त्याला दाटलेली गर्दी यातूून जिल्हा पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’च्या उंबरठ्यावर उभा राहीला आहे. जिल्ह्यात आजही रुग्णवाढीची गती गेल्या महिन्याच्या तुलनेत तिपटीने अधिक होती. जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज 327 रुग्णांची भर पडली. संगमनेर तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 249 इतकी आहे.

चालू महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती दिवसोंदिवस अधिक चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. दररोज वाढत जाणार्या रुग्णसंख्येमुळे मध्यंतरी ओस पडलेली रुग्णालये पुन्हा एकदा बाधितांनी तुडूंब झाली आहेत तर प्रशासनाने बंद केलेली तालुक्यातील सर्व कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांकडून उपस्थितीच्या नियमांकडे झालेले दुर्लक्ष आणि ग्रामीण भागातील स्थानिक यंत्रणेला असे सोहळे रोखण्यात आलेले अपयश यामुळे तालुका पुन्हा एकदा कोविड संक्रमणाच्या दरीत लोटला गेला आहे. या कडीत दररोज मोठ्या संख्येने रुग्णांची भर पडतच आहे.

दैनिक नायकने कोविड संक्रमणाला काहीअंशी गती मिळाल्यापासून तालुक्यातील ग्रामीणभागात मोठ्या संख्येच्या उपस्थितीत पार पडणार्या अशा सोहळ्यांकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधले होते. मात्र ग्रामीणभागात संबंध टिकवण्याच्या नादात तेथील यंत्रणांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचेच चित्र सध्या तालुक्यात प्रचंड प्रमाणात पुन्हा वाढत चाललेल्या कोविड संक्रमणातून दिसून येत आहे. आता दैनिक नायकच्या वृत्ताची दखल घेवून जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक लग्नसोहळ्याचे चित्रीकरण काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार संगमनेरच्या तहसीलदारांनीही तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना पत्रव्यवहार केला असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार्या प्रत्येक लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. लग्न सोहळ्यांमधून कोविड पसरतोय हे समजण्यास आणि त्यावर निर्णय घेण्यास प्रशासनाला बराच वेळ लागल्याने या कालावधीत तालुक्यातील कोविड स्थिती चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे. अजूनही अनेक नागरिकांना त्याचे गांभिर्य नसल्याचेही तालुक्यातून दिसून येत आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर तालुक्यातील 39 जणांना नव्याने कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील बावीस जणांचा समावेश असून त्यात, इंदिरानगरमधील 77 व 53 वर्षीय इसमासह 68 व 24 वर्षीय महिला, अकोले बायपास रस्त्यावरील 29 व 26 वर्षीय तरुणासह 23 वर्षीय महिला, शिवाजीनगर मधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय महिला, जनतानगर मधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 वर्षीय तरुण, भारत नगरमधील 28 वर्षीय महिला, चंद्रशेखर चौकातील 13 वर्षीय मुलगी, बाजारपेठेतील 45 वर्षीय महिला, वाडेकर गल्लीतील 33 वर्षीय तरुण, नवीन नगर रस्त्यावरील 65, 54 व 45 वर्षीय महिलांसह 11 वर्षीय मुलगा, नेहरु चौकातील 34 वर्षीय तरुण, बटवाल मळ्यातील 55 वर्षीय इसम व मालदाड रोडवरील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.

तर ग्रामीणभागातील कासारा दुमाला येथील 50 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 54 वर्षीय इसमासह 41 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 46 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 33 वर्षीय तरुण, राजापूर येथील 57 वर्षीय इसम, गुंजाळवाडी येथील 53 व 48 वर्षीय इसमांसह 22 वर्षीय तरुण, रणखांब येथील 17 वर्षीय तरुण, घारगाव येथील 50 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 39 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 38 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, आश्वी बु.मधील 23 वर्षीय महिला व देवकौठे येथील 50 वर्षीय इसम अशा एकूण 39 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्यातील सक्रीय संक्रमितांची संख्या आता 249 झाली आहे.

लग्न सोहळ्यांमधून कोविडचा प्रादुर्भाव वाढतोय असे निरीक्षण समोर आल्यानंतर जिल्ह्यात यापुढील काळात पार पडणार्या सर्व विवाह सोहळ्यांचे चित्रीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. त्यानुसार संगमनेरच्या तहसीलदारांनी संगमनेर शहर, तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्यांना पत्रव्यवहार करुन त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सोहळ्यांचे चित्रीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आता यापुढे तालुक्यातील सर्व विवाह सोहळे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

