सार्वजनिक बांधकामच्या लेखी आश्वासनानंतर आत्मक्लेश आंदोलन स्थगित कळस बुद्रुक ग्रामस्थांनी अकोले-कळस रस्त्याच्या कामासाठी पुकारले होते आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
कोल्हार-घोटी राज्यमार्ग 50 वरील अकोले-कळस हा रस्ता येत्या दहा दिवसांत दहा मीटर रुंद करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी (ता.10) दिल्याने कळस बुद्रुक ग्रामस्थांनी आत्मक्लेश आंदोलन स्थगित केले.

कळसचे सरपंच तथा रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, भाजप तालुका सरचिटणीस तथा माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना तालुका समन्वयक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी संगमनेर-अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर प्रवरा नदी पुलावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलेचे उपविभागीय अभियंता जे. एम. कडाळे, संगमनेरचे उपविभागीय अभियंता सौरभ पाटील, शाखा अभियंता आर. डी. पाचोरकर, अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी मध्यस्थी करून आंदोलन मिटवले.

कोल्हार-घोटी राज्य मार्गाचे काम भाजप सरकारच्या काळात सुरू केले आहे. मात्र काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. अकोले तालुक्यातील गौण खनिज वापरून संगमनेर तालुक्यात काम सुरू आहे. मात्र, अकोले तालुक्यातील काम बंद आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील रस्ता खूप खराब झाला आहे. वर्दळीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तर अनेक ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे. त्यातच अगस्ति कारखान्याची ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अनेक प्रवाशांना आपला मार्ग बदलावा लागत आहे. तर अनेकजण अपघात होवून जखमी झाले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही. यामुळे ग्रामस्थांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

भाजप सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केलेले रस्त्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. अकोले तालुका सरहद्दीपर्यंत अकोले-कळस रस्त्याचे काम बंद करून संगमनेर तालुका हद्दीत काम सुरू केले आहे. दहा दिवसांत जर काम झाले नाही तर ठेकेदाराचे एकही वाहन रस्त्यावर चालू देणार नाही.
– भाऊसाहेब वाकचौरे (सरचिटणीस, अकोले भाजप)

Visits: 129 Today: 1 Total: 1425762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *