सामान्य कुटुंबातील तरुण अडकला बनावट नोटांच्या जाळ्यात! ‘कुरियर’ कंपनीच्या तपासातून ‘गुप्तचर’ यंत्रणेचा छापा; गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचा लिपिकच छापत होता नोटा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने गुरुवारी रहाणेमळ्यात छापा घालून ‘हाय सिक्युरिटी’ श्रेणीतील कागदाचा वापर करुन बनावट नोटा छापण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक केली. आरबीआय ट्रेड म्हणून ओळखला जाणारा हा कागद भारतात विकण्यास मनाई आहे. त्यामुळे तो अन्य देशातून तस्करीद्वारा भारतात आणला जातो. महसूल चुकवून देशात आणल्या जाणार्‍या वस्तूंवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा महसूल विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या दिल्ली शाखेला एका कुरिअर कंपनीद्वारा देशात मोठ्या प्रमाणात हा कागद वितरित झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या तपासात संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीतही या कागदाची डिलिव्हरी झाल्याचे समोर आल्यानंतर विभागाच्या पुणे युनिटने शहर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी संशयीताच्या घरावर छापा घातला. या कारवाईत रजनीकांत राजेंद्र रहाणे या गुंजाळवाडी ग्रामपंचायत लिपिकाच्या घरातून या कागदाचा अख्खा एक ‘रिम’ जप्त करण्यात आला. त्याच्या घराच्या झाडाझडतीत त्याने या कागदावर नोटा छापण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे पुरावेही पथकाच्या हाती लागले. हा प्रकार केवळ संगमनेरपूरता मर्यादीत नसून त्याची व्याप्ती देशभर आहे. त्यामुळे बनावट नोटा छापणार्‍यांची मोठी साखळी यातून उघड होण्याची शक्यता आहे. या कागदाचे ‘दोन’ रिम संगमनेरात ‘डिलिव्हर’ झाल्याची यंत्रणांना माहिती असून दुसरा ‘रिम’ कोठे वितरित झाला याची माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे.


गुरुवारी सकाळी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पुणे युनिटमधील चारजणांच्या पथकाने संगमनेरचे उपअधिक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह गुंजाळवाडी शिवारातील रजनीकांत रहाणे याच्या घरावर छापा घातला. ही कारवाई बनावट नोटांच्या संदर्भात असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या दिल्ली मुख्यालयाला डीटीडीसी या कुरिअर कंपनीकडून देशभरात अनेक ठिकाणी हाय सिक्युरिटी थे्रड श्रेणीतील कागदाचे मोठ्या प्रमाणात वितरण झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या तपासात देशभरात छापेमारी सुरु असतानाच त्यातील कागदाचे दोन रिम 29 ऑक्टोबर 2024 रोजी संगमनेर तालुक्यात वितरित झाल्याचेही पुढे आले. त्यानुसार गुप्तचर विभागाच्या पुणे युनिटने गुरुवारी सकाळी नऊ वाजता गुंजाळवाडी शिवारातील रहाणेमळ्यात राहाणार्‍या रजनीकांत राजेंद्र रहाणे (वय 31) याच्या घरावर छापा घातला. त्यावेळी पथकाला त्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत प्लास्टिकच्या पिशवित गुंडाळून ठेवलेले हाय सिक्युरिटी आरबीआय ट्रेड म्हणून ओळखले जाणारे शंभर कागद (एक रिम) आढळून आले.


या कागदांमध्ये हाय सिक्युरिटी थ्रेड असल्याचेही आढळून आल्यानंतर पथकाने संशयीताला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या घराच्या पाहणीत कचर्‍यात पेटीत चुरगाळून टाकलेल्या कागदाचे काही पूंजकेही आढळून आले. त्याची तपासणी करता त्याने एचपी कंपनीच्या रंगित प्रिंटरवर शंभर व पाचशे रुपयांच्या नोटा छापण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. यावेळी पथकाने सदरचा कागद कोठून मागवला अशी विचारणा केली असता त्याने ‘अलिबाबा’ या नावाच्या ऑनलाईन साईटवरुन मागवल्याची माहिती दिली. पथकाने त्याचा मोबाईल ताब्यात घेवून तपासला असता त्याला प्राप्त झालेल्या पार्सलची संपूर्ण माहिती त्यात आढळली. प्राथमिक चौकशीत त्याने सदरील कागद ‘ऑनलाईन’ मागवल्याचे सांगितले असले तरीही गुप्तचार यंत्रणांना त्यावर भरवसा नाही. हा कागद तस्करीतून चायनासारख्या देशातून मागवण्यात आल्याचा संशय असून त्या दृष्टीने तपासही सुरु आहे.


गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार आरबीय ट्रेड म्हणून देशभरात विक्री करण्यास बंदी असलेल्या या कागदाचे दोन रिम (प्रत्येकी शंभर कागद) संगमनेर तालुक्यात वितरित झाले आहेत. मात्र दुसरा रिम अद्यापही हस्तगत झालेला नाही अथवा त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ‘त्या’ रिमबाबत आरोपी रहाणेला माहिती असावी असा यंत्रणांना संशय आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या कोठडीतील चौकशीसाठी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी संगमनेरात येण्याची शक्यता आहे. सध्या स्थानिक पातळीवर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विश्‍वास भान्सी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. या प्रकरणात अटक झालेला रजनीकांत रहाणे हा तरुण ग्रामपंचायतीत लिपित म्हणून कार्यरत असून त्याला 25 हजार रुपये पगार आहे. शिवाय दोन गोदामे भाड्याने दिल्याने त्याचेही उत्पन्न मिळते. घरात दुभत्या गायी आहेत, त्याचेही दूध डेअरीला जाते, एक-दीड एकराचे मोक्यावरील रान आहे.


आरोपीच्या वडिलांचे निधन झालेले असून घरात कर्करोगाने ग्रस्त असलेली आई, पत्नी, पाच-सहा वर्षांची दोन लेकरं आणि विवाहित असलेल्या दोन बहिणी असा परिवार आहे. घरात सर्वकाही व्यवस्थित असताना, ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही भरमसाठ माया गोळा झालेली असताना त्याला बनावट नोटा छापण्याची दुर्बूद्धी सूचली आणि तो केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या जाळ्यात अडकला. घरात सर्वकाही आलबेल असताना त्याच्या या कृत्याने गुंजाळवाडीत आश्‍चर्य निर्माण झाले असून संपन्न कुटुंबातील एखादी व्यक्ति अशी अविचारी कृती कशी करेल असा प्रश्‍न विचारला जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीत अजून काय आढळून येते हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे. पोलिसांना आणखी एका रिमचा संशय असल्याने तो कोणाकडे आढळतो? याबाबत उत्कंठाही दाटली आहे.


गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये गेल्या दहा वर्षांपासून लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या रजनीकांत राजेंद्र रहाणे (वय 31) याला अटक झाल्यानंतर आता त्याने गेल्या दहा वर्षात विकसित झालेल्या गुंजाळवाडी शिवारातील लोकवसाहतींच्या कामात मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ केल्याचा संशय व्यक्त होत आहे. अविचाराने वाट्टेल तशा बांधकाम परवानग्या दिल्या गेल्याने गुंजाळवाडी शिवाराची वाढ अतिशय गचाळ पद्धतीने झाली आहे. त्यात रजनीकांत रहाणे यांचा मोठा वाटा असल्याचेही आता बोलले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने गुंजाळवाडी हद्दितील सर्व बांधकांमांचे पुनःमूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. त्यातूनही आरोपी रजनीकांत रहाणे याचे कारनामे समोर येण्याची शक्यता आहे. बनावट नोटा छापण्याच्या दहा वर्षांची कैद असलेल्या प्रकारात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण अडकल्याने एकीकडे हळहळ व्यक्त होत असतानाच दुसरीकडे त्याला थेट केंद्रीय गुप्तचरांनी पकडल्याने आश्‍चर्यही व्यक्त होत आहे.

Visits: 47 Today: 1 Total: 306781

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *