पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार
पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणीस मैल येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा जागीच ठार झाला आहे. ही घटना बुधवारी (ता.4) सकाळी घडली आहे. यामुळे महामार्ग ओलांडणाच्या नादात आणखी किती वन्यप्राण्यांना आपले जीव गमवावे लागणार असा प्रश्नही वन्यजीवप्रेमींकडून विचारला जात आहे.
पठारावरील खंदरमाळवाडी शिवारातील एकोणीस मैल येथे बुधवारी सकाळी महामार्ग ओलांडत असताना अचानक अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने कोल्हा जागीच ठार झाला. दरम्यान, येथून जाणार्या-येणार्या नागरिकांनी ही घटना पाहिली असता तात्काळ वन विभागाच्या अधिकार्यांना माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक सविता थोरात, बाळासाहेब वैराळ यांनी घटनास्थळी धाव घेत मृत कोल्ह्याला कोठे बु. रोपवाटिकेमध्ये आणून अंत्यसंस्कार केले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भक्ष्याच्या नादात महामार्ग ओलांडणाच्या नादात अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने वन्यप्राण्यांना जीव गमवावे लागत आहे. त्यामुळे वन विभागाने उपाययोजना आखून वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमींमधून होत आहे.