शिरापूरची पाणी योजना थोरात कारखान्याच्या सहकार्यातून पूर्ववत जलपूजनासह शाळा खोली बांधकाम व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. यामुळे शेतीला पाणी उपलब्ध होत आहे. अनेक दिवसापासून बंद असलेली शिरापूर येथील हनुमान सहकारी पाणी पुरवठा योजना थोरात कारखान्याच्या पुढाकारातून पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून, नुकतेच या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
शिारपूर येथे पाणी पुरवठा योजनेचे जलपूजन, जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम व रस्त्याचा शुभारंभ अशा विविध कामांचा शुभारंभ थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, उपसभापती नवनाथ अरगडे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, गणपत सांगळे, रमेश गुंजाळ, नानासाहेब शिंदे, सुभाष सांगळे, मंदा वाघ, भाऊ पारासूर, शैला पारासूर, योगेश पवार, दिलीप वर्पे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतना इंद्रजीत थोरात म्हणाले, अकोले-संगमनेरांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली 1985 ते 1989 या काळात मोठी चळवळ झाली. 1989 मध्ये 30 टक्के हक्काचे पाणी संगमनेर तालुक्याला मिळाले आणि त्यामुळे आपल्याला शेती करताना पाणी वापरता आले. सहकारमहर्षी थोरात यांनी जिल्हा आणि राज्य बँकेच्या माध्यमातून पाईपलाईनसाठी मोठा आर्थिक पुरवठा केला. त्यामुळे खर्या अर्थाने शेतकर्यांमध्ये समृद्ध आली. हीच परंपरा महसूल मंत्री थोरात यांनी जोपासली असून तालुक्यात पाण्याचे जाळे निर्माण करत आहे. निळवंडे धरणाची निर्मिती करताना कालव्यांद्वारे तळेगाव गट व दुष्काळी भागाला पाणी देणे हा त्यांचा ध्यास आहेच. पण त्याचबरोबर जास्तीत जास्त गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांमधून शेतीला पाणी पुरवण्यासाठी हरिश्चंद्र पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून शेतकर्यांना प्रोत्साहित केले जात आहे. सहकार तत्वावर होणार्या पाणी पुरवठा योजनेमुळे संगमनेर तालुका मॉडेल ठरला आहे. प्रास्ताविक युवा कार्यकर्ते योगेश पवार यांनी करुन आभार मानले.