‘अखेर’ पत्रकार बाळ बोठे न्यायालयाकडून ‘फरार’ घोषीत! 9 एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीसह बँक खातीही गोठवणार..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
दोषारोपपत्र दाखल करण्याचा नव्वद दिवसांचा कालावधी उलटूनही यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे कायद्यापासून अद्याप दूरच आहे. त्यामुळे पारनेर पोलिसांनी त्याला फरार घोषीत करण्यासाठी पारनेरच्या प्रथमवर्ग कनिष्ठस्तर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज (ता.4) न्यायाधीश उमा बोर्हाडे यांनी बोठेला फरार घोषीत करण्यासह 9 एप्रिलपर्यंत न्यायालयासमोर हजर होण्यास सांगीतले आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत बोठे हजर न झाल्यास त्याच्या मालमत्तेच्या जप्तीसह त्याची बँक खाती गोठवण्याची प्रक्रीया पोलिसांकडून सुरु होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
गेल्या वर्षी 30 नोव्हेंबररोजी पुण्याहून नगरकडे आपल्या खासगी वाहनातून परतत असतांना यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची पारनेरनजीकच्या जातेगाव घाटात दोघा दुचाकीस्वारांनी कट मारल्याचे कारण करुन धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली होती. यावेळी जरे यांच्या वाहनात त्यांच्या मातोश्री, मुलगा व त्यांची मैत्रिणही होती. या गदारोळातही जरे यांच्या मुलाने आपल्या मोबाईलमध्ये मारेकर्याचा फोटो काढल्याने पोलिसांचे काम सोपे केले होते. त्यानुसार पोलिसांनी जलदगतीने तपासाची सूत्रे फिरवित जरे यांच्यावर हल्ला करणार्या फिरोज शेख व गुड्डू शिंदे या दोघांना श्रीरामपूरातून अटक केली.
त्यांच्या चौकशीतून आदित्य चोळकेचे नाव समोर आले, त्याच दिवशी त्यालाही राहुरी नजीक ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून केडगावमधील सागर भिंगारदिवेचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो थेट कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथकेही रवाना झाली. या दरम्यान जरे यांचा अंत्यविधी पार पडला. या संपूर्ण घडामोडीत अर्थात जरे यांच्यावर हल्ला झाल्यापासूनच बोठे हा जरे यांच्या प्रकरणात सहभागी होता. त्यानेच पारनेरच्या टोलनाक्यावर रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत जरे यांना जिल्हा रुग्णालयात आणले, तेथे येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाल्यावर त्याने त्यांच्या अंत्यविधीतही बरीच लुडबूड केली.
दरम्यान कोल्हापूरात गेलेल्या पथकाने सागर भिंंगारदिवेच्या मुसक्या आवळताच त्याने या हत्याकांडामागे पत्रकार बाळ बोठे असल्याचा खुलासा केला. त्यावर पोलिसही काहीवेळ चक्रावले होते. त्यावर मात करुन पथकातील पोलिसांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविली. त्याची किंचित कुणकूण लागल्याने पोलीस बोठेच्या दारात येण्यापूर्वीच तो सहिसलामत पसार झाला, तो आजवर पसारच आहे. या दरम्यान त्याने वकीलांमार्फत नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यामुळे बोठेसमोर एकतर सर्वोच्च न्यायालयात जाणे अथवा पोलिसांना शरण येणे हे दोनच पर्याय राहीले आहेत.
त्यातच गुन्हा दाखल होवून 90 दिवसांचा कालावधी लोटल्याने या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पारनेरच्या कनिष्ठस्तर प्रथमवर्ग न्यायालयात बाळ बोठे याला फरार घोषीत करण्यासाठी अर्ज केला. बुधवारी (ता.3) त्यावर सविस्तर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज गुरुवारी (ता.4) न्यायाधीश उमा बोर्हाडे यांनी बाळ बोठेला फरार घोषीत केले. त्यासोबतच 9 एप्रिलपर्यंत त्याला शरण येण्यास सांगण्यात आले. तो पर्यंत पोलिसांकडून बोठेच्या मालमत्तेची, बँकेतील खात्यांची, लॉकर्सची व अन्य माहिती संकलित केली जाणार आहे.