नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा ः पिचड राजूरमध्ये दोनशे खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या रोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येणारा काळ अतिशय धोकेदायक असून सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.

माजी मंत्री पिचड यांच्या सूचनेप्रमाणे बुधवारी (ता.14) राजूर येथे दोनशे खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार मुकेश कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे, ग्रामीण रुग्णालय राजूरचे डॉ.रामनाथ दिघे, राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, डॉक्टर शेळके, डॉक्टर शिंदे, महसूलचे ज्ञानेश्वर बांबळे, सरपंच गणपत देशमुख, सदस्य भास्कर येलमामे, पत्रकार, व्यापारी राम पन्हाळे, सुधीर ओहरा, आदिवासी विकास प्रकल्पाचे शेणकर, गणेश पंडीत, डॉ.बाबासाहेब गोडगे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नाडेकर आदी उपस्थित होते.

राजूर येथील आदिवासी विकास विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था या तीन ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले. त्यासाठी जेवणाचा खर्च राजूर ग्रामपंचायत, औषधे व्यापारी संघटना व सामाजिक कार्यकर्ते, स्वच्छतेचा खर्च राजूर ग्रामपंचायत, आदिवासी विकास, आरोग्य कर्मचारी आणि खासगी डॉक्टर आदी करणार आहेत. तसेच संरक्षण व शिस्तीसाठी पोलीस व गृहरक्षक दल कार्यरत राहणार आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’साठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होत आहे. त्यासाठी तालुक्यातील जनतेने सामाजिक भावनेतून आपण सुरक्षित राहून इतरांना मदत करावी. अकोले, राजूर येथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात येत असून यासाठी दात्यांनी यथायोग्य मदत करावी असे आवाहन माजी आमदार पिचड यांनी केले.

Visits: 103 Today: 1 Total: 1101299

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *