खुणेगावच्या शेतकर्‍याला पोलिसांत न्याय मिळेना…

नायक वृत्तसेवा, नेवासा
सातबारा उतारा आमचा, न्यायालयाचा आदेशही आमच्या बाजूने लागला, आम्ही शेतात ज्वारी पेरली. मात्र सोंगणी दुसरेच लोक दादागिरीने करत असल्याने आम्ही नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी सोंगणी करणार्‍यांना न रोखता उलट आम्हालाच दिवसभर पोलीस ठाण्यात बसून ठेवले. यावरुन येथेही न्याय मिळत नसल्याने दाद कोणाकडे मागायची अशी कैफियत खुणेगाव (ता.नेवासा) येथील शेतकरी दिगंबर हरीभाऊ कदम यांनी मांडली आहे.

याविषयी कैफियत मांडताना शेतकरी कदम म्हणाले, शेती आमची, न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लागला. मग शेतात ज्वारी आम्ही पेरली अन् दुसरेच लोक तिची सोंगणी करत असल्याने तक्रार देण्यासाठी मी व माझा मुलगा नेवासा पोलीस ठाण्यात गेलो. मात्र दिवसभर फिर्याद घेतो बाबा, समोरचे बोलवून घेवू असे म्हणून मलाच दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. दुसरे लोक दिवसभर ज्वारी काढत होते. यावरुन पोलीस कधी खर्‍या गोष्टीची सत्यता पडताळून न्याय देणार का? असा खडा सवाल वयोवृद्ध शेतकरी कदम यांनी केला आहे. याबाबत मी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी माझ्यावर झालेल्या अन्यायाप्रकरणी कैफियत मांडली असून न्याय न मिळाल्यास नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *