जलवाहिनी फुटल्याने राहुरीची बाजारपेठ झाली जलमय! शेतकरी, व्यापारी व बाजारकरुंची उडाली तारांबळ; हजारो लिटर पाणी वाहिले
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात गुरुवारी (ता.4) आठवडे बाजाराच्या दिवशी भर बाजारात राहुरी पालिकेच्या पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली. यामुळे बाजारपेठेतील रस्ता जलमय होवून गुडघाभर पाणी वाहू लागले. तब्बल एका तासात हजारो लिटर पाणी बाजारपेठेत वाहिले. आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकरी व व्यापार्यांची एकच तारांबळ उडाली. अनेकजणांचा शेतमाल पाण्याबरोबर वाहून गेेला. दरम्यान, पालिका कर्मचार्यांनी पाणी पुरवठा बंद केल्याने बाजारकरुंनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजता बाजारपेठेतील महाराष्ट्र बँकेसमोर ही जलवाहिनी फुटली. यामुळे बाजारपेठेतील रस्त्यावरून गुडघाभर पाणी शनि-मारुती मंदिराच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पाण्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी बसलेल्या शेतकरी व व्यापार्यांचा शेतमाल पाण्याबरोबर वाहून जाऊ लागला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही तारांबळ उडाली.
राहुरीच्या बाजारपेठेतून सहा इंच व्यासाची लोखंडी व 14 इंच व्यासाची सिमेंटची जलवाहिनी आहे. त्यातील नेमकी कोणती जलवाहिनी फुटली याचा अंदाज येत नव्हता. 1998 साली पसरविलेल्या या जलवाहिन्या जीर्ण व कमकुवत झालेल्या आहेत. जलवाहिनी फुटल्याची माहिती समजताच दुपारी सव्वा एक वाजता जलकुंभावरुन पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख काकासाहेब अढांगळे त्यांच्या पथकासह बाजारपेठेत दाखल झाले. जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन तत्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. यामुळे पाणी वाया जाण्याचे थांबले.