अघोरी काळ्या जादूचा स्थानिकांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश! राहुरी फॅक्टरी येथील प्रकार; धक्कादायक घटनेने उडाली खळबळ
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी फॅक्टरी येथे शनिवारी (27) दांडी पौर्णिमेच्या रात्री गुरुकुल वसाहतीतील एका घरात चाललेल्या अघोरी काळ्या जादूचा पर्दाफाश स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे झाला. जादूटोण्यासाठी घरात मांडलेली पूजा पोलिसांनी उध्वस्त केली. पूजा मांडणारे पती-पत्नी व तीन मांत्रिकांना पोलिसांनी रविवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यांनी पोलीस ठाण्याकडे पाठ फिरविली.
राहुरी फॅक्टरी येथील शिक्षक कुटुंबांची सर्वाधिक संख्या असलेल्या गुरुकुल वसाहतीतील एका घरात शनिवारी पौर्णिमेच्या रात्री आठ वाजता अघोरी विद्या करण्यासाठी पूजा मांडली होती. दरवाजे, खिडक्या बंद करून घरात होमहवन सुरू होते. लिंबू, मिरच्या व काळ्या जादूचे साहित्य मांडले होते. होमाचा धूर व म्हसनी उदाचा तीव्र वास परिसरात पसरला. त्यामुळे शेजारील नागरिक सतर्क झाले. संबंधित दाम्पत्याच्या घरासमोर मोठी गर्दी जमली.
पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना माहिती समजताच रात्री दहा वाजता पोलिसांचे गस्तीपथक दाखल झाले. पोलीस शिपाई उत्तरेश्वर मोराळे व दिनेश आव्हाड यांनी घरात घुसून अघोरी पूजा उधळून लावली. दाम्पत्य, दोन महिलांसह तीन मांत्रिकांची नावे नोंदवून घेतली. उपस्थित नागरिकांसमोर मांत्रिकांनी चुकीची कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. संबंधितांना रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश देत पोलीस माघारी परतले. मात्र, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे पती-पत्नी व तिन्ही मांत्रिक दिवसभरात पोलीस ठाण्यात आले नाहीत. त्यांना पुन्हा बोलाविणार असल्याचे पोलीस निरीक्षक गाडे यांनी सांगितले. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.