पाणलोट क्षेत्र विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे फादर बाकर ‘देवदूत’ ः थोरात दरेवाडी येथे फादर बाकर यांच्या विचारांचा जागर करत अभिवादन सभा संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वित्झर्लंड सारख्या देशातून भारतात येऊन दुष्काळी व ग्रामीण भागातील गोरगरीब, पीडित माणसाच्या जीवनात पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे फादर हर्मन बाकर हे देवदूत असल्याची आदरांजली राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अर्पण केली.

संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथील वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्टमध्ये आयोजित फादर बाकर यांना अभिवादन श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे, पद्मश्री पोपट पवार, कृषीरत्न विजय बोराडे, बाजीराव खेमनर, शंकर खेमनर, लक्ष्मण कुटे, मीरा शेटे, गणपत सांगळे, इंद्रजीत खेमनर, सुनंदा भागवत, अजय फटांगरे, किरण मिंडे, सुरेश थोरात, सुहास आहेर, सुभाष सांगळे, पांडुरंग सागर, दरेवाडीचे उपसरपंच जनार्दन मैड, वॉटर संस्थेचे संचालक संदीप जाधव, कार्यकारी संचालक प्रकाश केसकर, प्रा.बाबा खरात आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, 1972 च्या दुष्काळापासून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व फादर हरमन बाकर यांची मैत्री झाली. या मैत्रीतून पुढे त्यांनी अविरतपणे ग्रामीण विकासाचे काम हाती घेतले. फादर बाकर यांनी मेंढवण येथून आपल्या कार्याला सुरुवात करत मेंढवण, म्हसवंडी, माळेगाव पठार, दरेवाडी यांसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पाणलोटाचे मोठे काम केले. ‘पायथा ते माथा’ हा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला. पाणलोट क्षेत्राच्या चळवळीत केलेल्या कामातून संगमनेर पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरला. यामध्ये लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि लोकसहभाग यांच्या सहभागातून झालेल्या या पॅटर्नची जर्मनीच्या पार्लमेंटमध्येही चर्चा झाली. टिकाव, पावडे हेच देव माणून गोरगरीबांच्या विकासासाठी निष्काम भावनेने अविरत करणारे काम करणारे फादर बाकर हे अत्यंत विद्वान व्यक्तीमत्त्व होते. ते सहज लोकांमध्ये सामावून जायचे. आयुष्याच्या उत्तरार्धात स्विझर्लंडमध्ये आपण त्यांना भेटावयास गेलो. त्यावेळी त्यांना खूप आठवणी दाटून आल्या. त्यांच्या विचारांचा जागर म्हणजे पाणलोट क्षेत्राची चळवळ अविरतपणे पुढे सुरू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली होणार असल्याचे थोरात यांनी म्हटले.

आमदार डॉ.तांबे म्हणाले, फादर बाकर यांना 14 भाषा अवगत होत्या. त्यांनी भारत ही कर्मभूमी मानली. त्यांनी सामान्य माणसांमध्ये देव पाहिला. देशातील जात, धर्म पंथाच्या सीमा ओलांडून हा तपस्वी माणूस गोरगरीबांसाठी सदैव देवदूत ठरणार आहे. पद्मश्री पवार म्हणाले, संगमनेरची भूमि ही संस्कारांची भूमी आहे. फादर बाकर यांनी दरेवाडीमध्ये अभिनव उपक्रम राबवला. त्यांच्या कार्यतूनच आम्हांला प्रेरणा मिळाली. मातीवर प्रेम करणारा हा माणूस होता. त्यांनी ही पाणलोटाची चळवळ देशभर पोहोचवली आहे. प्रास्ताविक उपसरपंच जनार्दन मैड यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाळासाहेब उंबरकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *