प्रश्न न विचारण्याची मानसिकता शिक्षणाच्या मार्गातला मोठा अडसर ः चासकर आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी भाषा दिन साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुलांच्या मनात जन्मजात असलेले कुतूहल आणि जिज्ञासा हे शिकण्यासाठी महत्त्वाचे भांडवल असते. मात्र आपल्या भारतीय समाजात प्रश्न न विचारण्याची परंपरागत मानसिकता शिक्षणाच्या मार्गातला सर्वात मोठा अडसर बनली आहे. त्यामुळे चिकित्सक विचार करणारे विज्ञाननिष्ठ नागरिक तसेच जागतिक कीर्तीचे संशोधक घडवण्यात आपल्या औपचारिक शिक्षणाला म्हणावे तितके यश आलेले नाही, असे परखड मत शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी नोंदवले. आयुष्यातील संभाव्य समस्यांना तोंड देण्यास समर्थ बनवणारे, शोधक वृत्तीला चालना देणारे आणि विद्यार्थ्यांना चौकस बनवणारे जीवनोपयोगी सकस शिक्षण आजच्या एकविसाव्या शतकाची गरज असून, पाठ्यपुस्तकांच्या पारंपारिक चौकटीत अडकलेल्या जुनाट मानसिकतेतून बाहेर पडून शिक्षकांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करत कल्पकतेने प्रयत्न करायची गरज असल्याचेही चासकर यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन आणि मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चासकर बोलत होते. ज्ञानोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण भांगरे अध्यक्षस्थानी होते. तसेच संस्थेच्या सचिव उज्ज्वला कानवडे उपस्थित होत्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश कानवडे यांनी संकलित केलेल्या ‘परिचय शास्त्रज्ञांचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन चासकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.

विज्ञान दिनानिमित्त ऑनलाइन घेतलेल्या ज्ञान-विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी अनुज वाकचौरे, आर्यन लांडगे, सार्थक शेळके, प्रणव येंधे, ओम लांडगे, काजल थोरात, दर्शना वाकचौरे, प्रेरणा वाकचौरे, कावेरी कर्पे यांना पारितोषिके देण्यात आली. भांगरे यांनी संशोधकांची चरित्रे अभ्यासण्याचा सल्ला दिला. रमेश कानवडे यांनी प्रास्ताविक केले. भारत कानवडे आणि के. एस. गावडे यांनी सूत्रसंचालन केले. एम. बी. भोर यांनी आभार मानले.

Visits: 3 Today: 1 Total: 23112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *