परप्रांतीय मालट्रक चालक मारहाण प्रकरणी आठ संशयित ताब्यात

परप्रांतीय मालट्रक चालक मारहाण प्रकरणी आठ संशयित ताब्यात
नगर-मनमाड महामार्गावरील थरारात एक चालक ठार; एक जखमी
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावरील निर्मळ पिंप्री शिवारातील टोलनाक्याजवळ मध्यप्रदेशच्या दोन मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. सदर घटना 6 सप्टेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली असून याप्रकरणी काल लोणी पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


भूपेंद्रसिंह बहादूरसिंह ठाकूर व कुलदीपसिंग तुंग हे दोघे मालट्रकमध्ये गहू भरून इंदूर येथून बेंगलोरच्या दिशेने जात असताना त्यांच्या ट्रकला नगर-मनमाड महामार्गावरील निर्मळ पिंप्री शिवारातील टोलनाक्याजवळ 6 ते 7 जण आडवे आले. त्यानंतर या सातजणांच्या टोळीने तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याच्या सहाय्याने भूपेंद्रसिंह बहादूरसिंह ठाकूर व कुलदीपसिंग तुंग यांना जबर मारहाण केली. यावेळी कुलदीपसिंग तुंग यांच्या मानेवर चाकू लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तसेच चोरट्यांनी मालट्रक चालकांकडील 300 रुपये काढून घेतले आणि तिथून पसार झाले.


याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुखांसह, वरीष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन अधिक माहिती घेतली आहे. या प्रकरणात काल रात्री उशिरा आठ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Visits: 160 Today: 1 Total: 1985889

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *