‘प्रहार’च्या पाठपुराव्यामुळे अहमदनगर-औरंगाबाद महामार्गाची दुरुस्ती सुरू ः पोटे नेवासा फाटा येथे दुभाजक बसविण्यासह ठिकठिकाणच्या खड्डे दुरुस्तीला सुरुवात
![]()
नायक वृत्तसेवा, नेवासा
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्यामुळे अहमदनगर-औरंगाबाद महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू झाले असून नेवासा फाटा येथे दुभाजक बसविण्यासह ठिकठिकाणच्या खड्डे दुरुस्तीला गुरुवारी (ता.25) सुरुवात झाली असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी दिली आहे.

याविषयी बोलताना जिल्हाध्यक्ष पोटे म्हणाले, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचे निवेदन देताच सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बँक विभाग यांनी के. टी. संगम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि अशोका ग्रुप, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे व प्रहार पदाधिकार्यांची तत्काळ 22 डिसेंबर, 2020 रोजी जागतिक बँक प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता राजगुरू यांच्या दालनात बैठक घेतली.

या बैठकीत रस्त्याच्या सुरक्षेबाबत सूचना करताना हॉटेल व्यावसायिक व इतर व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर जागोजागी दुभाजक फोडलेले असून रस्त्याचे थर वाढवल्याने त्यांची उंचीही कमी झालेली आहे. तसेय यावरील रिफ्लेक्टर लाईट कटर गायब आहेत. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याठिकाणी गतिरोधक दिसण्यासाठी चमकणारे दिवे, दिशादर्शक फलक नसल्याचे सांगितले. यामध्ये प्रामुख्याने नेवासा फाटा स्थळावर रोज अपघात होत असल्याचे लक्षात आणून दिले. याची दखल घेतली नाही तर प्रहार स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्यावर जागतिक बँक प्रकल्प विभागाने दखल घेऊन तत्काळ महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू केले असल्याचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले.

याचाच एक भाग म्हणून नेवासा फाटा येथे दुभाजक बसविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, जिल्हा सल्लागार महादेव आव्हाड, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, बाळासाहेब खर्जुले, नेवासा तालुका संघटक नवनाथ कडू, तालुका युवा संघटक अक्षय जगताप, जागतिक बँक प्रकल्प विभागाचे सहाय्यक अभियंता प्रदीप आदमाने, कंपनीचे अभियंता जफार शेख, खडका टोलचे व्यवस्थापक विलास देसले, विलास पवार उपस्थित होते.
