आजी-माजी आमदारांनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे ः अॅड.पोळ
आजी-माजी आमदारांनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे ः अॅड.पोळ
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
दिवसेंदिवस कोपरगाव तालुक्यात कोरोना साथीच्या आजाराचा कहर वाढत असून तालुक्यातील कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्या संजीवनी व कोळपेवाडी कारखान्याच्या माध्यमातून नागरिकांसाठी आजी-माजी आमदारांनी व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात अॅड.पोळ पुढे म्हणाले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरात तात्पुरता इलाज म्हणून एस. एस. जी. एम. कॉलेज व नुकतेच मुकबधीर विद्यालयात कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र तालुक्यात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. उपलब्ध माहितीप्रमाणे आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये दोन व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. यापेक्षा जास्त रुग्ण झाल्यास शिर्डी किंवा अहमदनगर शिवाय पर्याय उपलब्ध नाही. कोरोना साथ रोखण्यात शासनाला पाहिजे तेवढे यश मिळत नाही. या आधी शहरात वेळेवर उपचार मिळाला नाही म्हणून रुग्ण मयत झाले आहेत. याबाबत वेळीच जागृत होऊन आजी-माजी आमदारांनी शेतकर्यांच्या जीवावर उभारलेल्या संस्थांमधून व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.