कोपरगाव शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई दैनिक नायकच्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी सुरू केली मोहीम

वृत्तसेवा, कोपरगाव
शहर पोलीस ठाण्याची सूत्रे नव्यानेच स्वीकारलेले खमके व कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले शहरातील अवैध धंदे बंद करण्यास सुरुवात केली आहे. दैनिक नायकने 25 फेब्रुवारीच्या अंकात अवैध धंदे रोखण्याबाबत सूचित केले होते. त्याची दखल घेत पोलीस निरीक्षक देसले यांनी अवैध धंदे बंद करण्यासह चालकांच्या मुसक्या आवळण्याच्या मोहिमेचा शुभारंभच केला आहे. या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून स्वागत केले असून, कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सदर कारवाई बुधवारी (ता.24) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास धारणगाव रस्त्यालगत असणार्‍या गाळ्यातील मटक्यावर केली आहे. यावेळी एजाज निसार शेख (वय 30, रा.वैष्णोदेवी मंदिराजवळ गांधीनगर) हा अवैधरित्या टेबलावर 1 ते 10 अंक आकडे असलेला फलक लावून लोकांकडून पैसे वसुल करत होता. यामध्ये पोलिसांनी पत्याचा कॅट, 550 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपी शेख याच्याविरुद्ध शहर पोलिसांंनी गुरनं.62/2021, मुं.जु.का.क.12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

धडक कारवाईचा सिलसिला चालूच ठेवून सव्वाआठ वाजेच्या सुमारास खुले नाट्यगृहाजवळील गाळ्यात समीर हारुण सय्यद (वय 28, रा.मक्का मस्जिदजवळ गांधीनगर) हा देखील मटका चालवत असल्याचे आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी 700 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करुन गुरनं.63/2021 मुं.जु.का.क.12(अ) प्रमाणे शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तर गुरुवारी (ता.25) साडेसहा वाजेच्या सुमारास बसस्थानक ते अण्णाभाऊ साठे पुतळ्याकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भागात संतोष सीताराम तांबे (वय 31, मारुती मंदिराजवळ गांधीनगर) हा देखील मटका चालवत असल्याचे आढळले. यामध्ये पोलिसांनी 1100 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करुन शहर पोलिसांत गुरनं. 64/2021 मुं.जु.का.क.12(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहा.फौजदार एस.जी.ससाणे, एस.सी.पवार, पो.ना.बी.एस.कोरेकर, पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे, पो.कॉ.आर.जी.खारतोडे यांनी केली आहे.

शहर पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरवासियांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्याला खरे ठरवत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी धडक कारवाईचा पहिला अध्याय सुरू करुन शहरातील गुन्हेगारी नियंत्रण करण्याबाबतची पावले उचलली आहेत. या कारवाईचे शहरवासियांकडून स्वागत होत असून कारवाईत सातत्य ठेवण्याचीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *