काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा? दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीत राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केल्याचे वृत्त..


वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नववर्षाच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय काँग्रेस पक्षात बदलांचे वारे वाहू लागले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. यापूर्वी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यापासूनच काँग्रेसमध्ये खांदे बदलाची सुरुवात झाल्याचे मानले गेले होते. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्ली दरबारी पोहोचल्याने यावृत्तावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही ‘हायकमान’कडे सोपविल्याचे वृत्त असून त्याला वृत्तलिहेपर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


काँग्रेस पक्षातील अंतर्गत मरगळ झटकण्यासाठी देशपातळीवरील रखडलेल्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांसह काँग्रेसला कायमस्वरुपी राष्ट्रीय अध्यक्ष मिळावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यापूर्वी मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदल करुन भाई जगताप यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता प्रदेश पातळीवरील पदाधिकार्‍यांच्या नियुक्तिची प्रक्रीया सुरु झाली असून त्यासाठीच विद्यमान प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आज दिल्लीत पोहोचले आहेत. आज सकाळी त्यांनी दिल्लीत काँग्रेसनेते राजीव सातव व त्यानंतर पक्षाचे सचिव के.सी. वेणूगोपाल यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.


यावेळी थोरात यांनी पक्षाच्या सचिवांसमोर आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केल्याचेही वृत्त प्राप्त झाले आहे. दुपारनंतर सदरचा प्रस्ताव (राजीनामा) पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनीया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार असून त्यांनी तो मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रात नवी प्रदशाध्यक्षाचा शोध सुरु होईल. थोरात यांच्याकडे राज्याचे महसूल खाते, काँग्रेस विधिमंडळाचे गटनेते पद त्यासोबतच प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे कदाचित थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थोरात व सातव या राज्यातील दोन मोठ्यांमध्ये दिल्लीत बंद दाराआड चर्चा झाल्याचेही वृत्त असून त्याचा तपशिल मात्र उपलब्ध झालेला नाही.


शांत आणि संयमी राजकारणी असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसांत रोखठोक भूमिका मांडल्यामुळे ते राज्यात केंद्रस्थानी होते. काँग्रेसच्या आमदारांना मिळणारा विकास निधी असो, अथवा मंत्रिमंडळातील कामाबाबतचे विषय त्यांनी त्यावर थेट भाष्य करुन नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्र्यांनाही त्याची दखल घ्यावी लागली होती. अलिकडेच त्यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरण विषयावर रोखठोक मत व्यक्त करतांना किमान समान कृती कार्यक्रमात हा विषय नव्हता, आणि नामांतरापेक्षा सामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे हा काँग्रेससाठी महत्त्वाचा विषय असल्याचे सांगून त्यांनी नामांतराला थेट विरोध नोंदविला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *