गोहत्या कायदा मोडणार्यांना सोडणार नाही ः ओला कोपरगावमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
समाज माध्यमांवर पोस्ट टाकताना भान ठेवा. समाजकंटकांना जात धर्म नसतो. ते फक्त तेढ निर्माण करतात. त्यासाठी सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. याशिवाय गोहत्या कायदा मोडणार्यांना सोडणार नाही आणि समाजकंटकांचे तडीपारीचे प्रस्ताव करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगावमध्ये शांतता समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, प्रदीप देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शांतता समितीच्या सदस्यांसह समाज बांधवांनी भावना व्यक्त केल्या. काळे-कोल्हे कुटुंबीय तालुक्याचे पालक आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी कुठल्याही पक्षात असो विचारांचे मतभेद असताना दोन समाजात तेढ निर्माण झाल्यास त्यांची मध्यस्थी अंतिम मानली गेली आहे. शहराच्या शांततेला गालबोट लावणार्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा. बाहेरून आलेले काही लोक शांततेला गालबोट लावत आहेत. वर्षानुवर्षे एकोप्याने राहणार्या शहरवासियांनी बाजारपेठेवर परिणाम होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे. गावगुंडांची जात न पाहता कारवाई करा असे विचार अनेकांनी व्यक्त केले. महानंदचे राजेश परजणे, कैलास जाधव, अस्लम शेख, जितेंद्र रणशूर, अकबर शेख, मेहमूद सय्यद, शफिक शेख आदिंनी यावेळी चर्चेत सहभाग नोंदवला.
बेकायदेशीर धंद्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. जो कोणी आरोपी असेल त्याचा शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे. सरसगट धर्माला दोषी धरू नये.
– आशुतोष काळे, आमदार
महिलेवर अत्याचार, अन्याय झाल्यास आरोपी कुठल्या का जाती-धर्माचा असेना त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. धर्माभिमान असला तरी धर्मांध होऊ नका.
– स्नेहलता कोल्हे, माजी आमदार