बोट्याजवळील अपघातात वायूदलाच्या जवानासह एका तरुणीचा मृत्यू! वाग्निश्चय झालेल्या तरुण अधिकार्याच्या अपघाती मृत्यूने तालुक्यातील पठारभाग हळहळला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या शनिवारी पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा बाह्यवळण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील एका तरुण अधिकार्यासह त्याच्या वाग्दत्त वधुचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेले दुसरे जोडपेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या या भीषण अपघातात भारतीय वायूदलातील तरुण अधिकार्याचा बळी गेल्याने संगमनेर तालुक्यातील पठारभागातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पुणे व नाशिक येथील लष्करी अधिकार्यांनी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात गर्दी केली होती.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एन.डी.ए) आशिषकुमार दीपचंद कुशवाह, त्यांची वाग्दत्त वधू रश्मी राघव, अंगद विनय देवस्थळे व सानिका लागू हे चौघे शनिवारी (ता.20) पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होते. यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची होंडा वर्ना कार (क्र.एम.एच.12/एच.झेड.7582) संगमनेर तालुक्यातील बोटा बाह्यवळणावर आली असता समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात पुलावरुन अनेक पलट्या मारीत खाली कोसळली.

हा अपघात इतका भयंकर होता की त्यात अपघातग्रस्त वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सदरचे वाहन पुलाला धडकून खाली कोसळताना मोठा आवाज झाल्याने आसपासचे नागरिक लागलीच घटनास्थळी धावले व त्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढले. तोवर डोळासणे महामार्ग पोलिसांसह घारगावचे पोलिसही घटनास्थळी पोहोचले होते. वरील चौघांनाही संगमनेरातील खासगी रुग्णालयात आणल्यानंतर त्यातील आशिषकुमार कुशवाह या वायूदलाच्या अधिकार्यासह त्यांची वाग्दत्त वधू रश्मी राघव यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर दुसरे अधिकारी अंगद देवस्थळे व सानिका लागू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ नाशिकला हलविण्यात आले.

या अपघातात बळी गेलेल्या दोघांचेही पार्थिव शनिवारी रात्री नगरपालिकेच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आले. रविवारी सकाळी याठिकाणी पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील अधिकार्यांसह वायूदलातील त्यांच्या मित्रांची मोठी गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पुण्यातील लष्करी रुग्णालयात पाठविण्यात आला. रविवारी सकाळपासूनच सैन्य दलातील अधिकार्यांसह संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सुनील पाटील व पांडुरंग पवार यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी पालिकेच्या आवारात थांबून होते.
