रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिमांचे दोन गट एकमेकांना भिडले! शस्त्रांचा मुक्त वापर; नगरसेवकासह तीस जणांवर शस्त्रास्त्र व विनयभंगासह दंगलीचा गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा शेवट दोन गटांचा एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात झाला. शहरातील नाईकवाडपुर्‍यातील जामा मशिदीच्या परिसरात घडलेल्या या दंगलीत मावळलेल्या सभागृहाचा सदस्य असलेल्या नगरसेवकासह सुमारे तीस जणांनी हातात तलवार, चाकू, हॉकीस्टिक घेवून दुसर्‍या गटावर हल्ला केला. त्यात चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेला जबाबदार असलेल्या ज्ञात आठ जणांसह एकूण 28 जणांवर भारतीय शस्त्र कायद्यासह विनयभंग, दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने नाईकवाडपुरा परिसरात शुक्रवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबत जखमी असलेल्या एका तरुणाच्या आईने आज (ता.22) पहाटे पावणे दोनच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार काल सायंकाळी पीडित महिला बाजारातून आपल्या नाईकवाडपुरा भागातील घराकडे जात असताना आरोपी अहमद अब्दुल वाहिद शेख (रा.जामा मशिद) याने त्यांना अडवून त्यांच्या हात धरीत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव व कृत्य केले. त्यावेळी पीडितेचा मुलगा मध्ये आला असता त्याला अहमद शेख याच्यासह संगमनेर नगरपालिकेच्या मावळत्या सभागृहाचा सदस्य असलेला नगरसेवक रिजवान अब्दुल वाहिद शेख (रिजवान मंत्री), जयेश अहमद शेख, रेहान रईस शेख व नवाज शेख यांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्या दरम्यान जयेश शेख या आरोपीने हातातील हॉकीस्टिक घेवून पीडितेच्या मुलावर हल्ला चढवला. हा प्रकार पाहून हामजा मुसा सय्यद, कैफ परवेज शेख व अमन अकील शेख (सर्व रा.नाईकवाडपुरा) यांनी सदरील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता वरील जमावाने त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या गदारोळात आवेशात असलेल्या नवाज शेख याने हातातील तलवारीने हामजा मुसा सय्यद याच्यावर वार केला, मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी तो हुकवल्याने ते बालंबाल बचावले. एकीकडे हातात शस्त्र घेवून काहीजण दहशत निर्माण करीत असताना दुसरीकडे कलीम कादरी, रेहान शेखचा छोटा भाऊ (नाव माहिती नाही.), फारुक शेख उर्फ मुन्ना व इतर 15 ते 20 जणांनी हामजा सय्यद याला बेदम मारहाण करीत त्या सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या मारहाणीत पीडितेच्या मुलासह वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारे हामजा मुसा सय्यद, कैफ परवेज शेख व अमन अकील शेख (सर्व रा.नाईकवाडपूरा) असे चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने आज (ता.22) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अहमद अब्दुल वाहिद शेख, रिजवान अब्दुल वाहिद शेख (रिजवान मंत्री), जयेश अहमद शेख, रेहान रईस शेख, नवाज शेख, कलीम कादरी, रेहान शेख व फारुख उर्फ मुन्ना शेख या निष्पन्न आरोपींसह 15 ते 20 अज्ञात इसमांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 354, 143, 147, 149, 323, 504, 506 सह भारतीय शस्त्र कायद्याचे कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता.21) रात्री नऊच्या सुमारास नाईकवाडपुर्‍यात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्यासह स्थानिक पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूने जमलेला जमाव पांगवला. यावेळी पोलिसांना सौम्य बळाचाही वापर करावा लागला. या घटनेने नाईकवाडपुरा परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या या परिसरात शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पहाटे छापासत्रही सुरू केले, मात्र अटकेच्या भीतीने बहुतेक आरोपी पसार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान महिना अत्यंत पवित्र समजला जातो. महिनाभर कडक उपवास आणि ईशप्रार्थना करण्यात घालवल्यानंतर येणारी ईद गरीब-श्रीमंत असे सगळेचजण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करतात. शुक्रवारी रात्री नाईकवाडपुर्‍यात घडलेला प्रकार रमजान ईदच्या पूर्वसंध्येलाच घडल्याने त्यातून या उत्सवावर एकप्रकारे विरजण पडले आहे. लहान मुलांच्या किरकोळ भांडणांमध्ये जेव्हा घरातील मोठी माणसं सहभागी होतात, तेव्हा काय घडते हेच या घटनेतून समोर आले आहे. हा प्रकार सुरू असताना शहर पोलीस ठाण्यातून पोलिसांच्या तुकड्यांनी सायरन वाजवत घटनास्थळाकडे धाव घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चांनाही उधाण आले होते.


मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या घटनेमागे लहान मुलांमध्ये झालेले वाद कारणीभूत असल्याचे समजले जाते. विशेष म्हणजे या परिसरात राहणारे माजी नगरसेवक रिजवान मंत्री हे मुस्लिम समाजातील अशा प्रसंगात नेहमीच मध्यस्थाच्या भूमिकेत असल्याचे यापूर्वी वेळोवेळी दिसून आले आहे. या घटनेत मात्र त्यांनीच इतरांना मारहाण करुन आपल्या साथीदारांना प्रोत्साहित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Visits: 25 Today: 1 Total: 115487

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *