… अखेर चोरीला गेलेली स्पोर्ट बाईक सापडली!

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या चिचदरा येथून वैभव सुनील शेळके या तरुणाची अज्ञात चोरट्याने 3 लाख 40 हजार रुपये किंमतीची स्पोर्ट बाईक चोरुन पोबारा केला होता. ही घटना मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर ही बाईक गुरुवारी (ता.16) पिंपळगाव देपा येथील एका विहिरीत आढळून आली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वैभव शेळके हा तरुण निमगाव पागा (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील राहणार असून त्याच्याकडे (एमएच.03, डीटी.2101) या क्रमांकाची स्पोर्ट बाईक होती. तो बोटा (चिचदरा) येथील मामाकडे आला होता. 24 ऑगस्टला ही बाईक घरासमोरच लावली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्पोर्ट बाईक चोरुन पोबारा केला होता. सकाळी झोपेतून उठल्यावर बाहेर येवून पाहिले असता तर बाईक नव्हती. त्यामुळे हा तरुण घाबरुन गेला होता. त्याने परिसरात बाईकचा सगळीकडे शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही. अखेर घारगाव पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं.198/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही स्पोर्ट बाईक पिंपळगाव देपा परिसरातील पांडुरंग उंडे यांच्या विहिरीत आढळून आली. पंचायत समिती सदस्य किरण मिंढे, पांडुरंग उंडे, तुकाराम उंडे, हरिभाऊ खरात, बन्सी कढणे, संपत मधे, अशोक मधे, गौतम पवार, संतोष पवार, पोलीस पाटील शिवप्रसाद दिवेकर आदिंनी दोरीच्या सहाय्याने ही स्पोर्ट बाईक विहिरीतून बाहेर काढण्यास मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *