राज्यातील शेतकरी बांधवांना शक्ती दे!
सप्तशृंगी मातेच्या चरणी माजी मंत्री थोरात यांची प्रार्थना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला असून अशा संकट काळामध्ये त्याला शक्ती दे व सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद, समाधान निर्माण होऊ दे अशी प्रार्थना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी केली.

शहरातील देवी गल्ली येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन त्यांनी महाआरती केली. यावेळी माजी आ.डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नवरात्र उत्सव हा भारतातील समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. हे आनंदाचे पर्व आहे. महिला शक्तीचा जागर यानिमित्ताने आपण करत असतो. महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे. सर्व लोक मोठ्या श्रद्धेने जगदंबा मातेचे दर्शन घेत असतात. यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला मात्र उत्तरार्धात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला आहे. अनेकांचे पशुधन मृत पावले आहे तर शेती खचली आहे. उभी पिके वाहून गेली आहेत. अशा संकट काळामध्ये या शेतकऱ्याला सावरण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करताना राज्य व केंद्र सरकारने शेतकरी बांधवांना तातडीने सरसकट कर्जमाफी करून मदत करण्याची सद्बुद्धी माता जगदंबेने द्यावी अशी प्रार्थना त्यांनी केली.

माजी आ.डॉ.तांबे म्हणाले की, श्री शक्तीचा जागर नवरात्राच्या निमित्ताने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात होत आहे. पर्यावरण पूरक आणि आनंदाने हा उत्सव सर्वांनी साजरा करावा. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असून सरकार मात्र सुस्त असल्याची टीका त्यांनी केली. तर दुर्गा तांबे यांनी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन केले.यावेळी सर्वांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी संगमनेर शहरातील विविध नवरात्र उत्सव मंडळांना भेटी दिल्या.

Visits: 24 Today: 1 Total: 1108782
