संगमनेर बाजार समितीकडून कायम शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा ः थोरात वडगाव पान येथे उपबाजार समिती व अंतर्गत रस्ते कामांचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या बाजार समित्या संपूर्ण देशासाठी मॉडेल ठरल्या आहेत. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बाजार समित्या मोठ्या संकटात आल्या असून केंद्राचे काळे कृषी कायदे रद्द होणे अत्यंत गरजेचे आहेत. यासाठी देशभरात मोठी आंदोलने होत असून सर्वांनी आंदोलनास पाठिंबा दिला पाहिजे. याचबरोबर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांना कायम अद्ययावत व चांगल्या सुविधांसह शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी काम केले असून, वडगाव पान येथील उपबाजार समितीमुळे चांगली सुविधा निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

वडगाव पान येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार येथील फ्लॉवर मार्केटचा शुभारंभ व अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ महसूल मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, सभापती शंकर खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, अ‍ॅड. माधव कानवडे, आर. बी. रहाणे, सभापती सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, लक्ष्मण कुटे, नाशिकचे शिवसेना नेते विजय करंजकर, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, बेबी थोरात, पद्मा थोरात, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, सरपंच श्रीनाथ थोरात, दत्तात्रय थोरात, बाजार समितीचे सचिव सतीष गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री थोरात म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या शेतकर्‍यांचा मूलभूत आधार आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. त्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे यासाठीच बाजार समित्यांची निर्मिती झाली. मात्र केंद्र सरकारच्या अत्यंत चुकीच्या धोरणामुळे समित्यांसह शेतकरी अडचणीत आला आहे. मागील सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकार त्याला दाद देत नाही. सरकारच्या या नव्या कायद्यांमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या शेतीमाल खरेदी करणार असून त्यांच्यावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. हे अत्यंत जुलमी कायदे रद्द झाले पाहिजे. यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला असून महाविकास आघाडी सरकारने या कायद्यांमध्ये आमुलाग्र दुरुस्तीसाठी विधानसभेत विधेयक मांडले आहे. यामध्ये शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य माणूस या सर्वांच्या सूचना विचारात घेऊन नवा कायदा तयार होणार असल्याचे नमूद केले.

याचबरोबर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्वात प्रथम संगणकीकरण करून शेतकर्‍यांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वडगाव पान येथील बाजार समितीमुळे भाजीपाला मार्केट हे इकडे येणार असल्याने स्वतंत्र विभाग तयार होईल. शिवाय हे ठिकाण मध्यवर्ती असून आगामी काळात रस्ते चौपदरीकरण, रेल्वे वाहतूक या सर्व सुविधांमुळे या बाजार समितीचे महत्त्व वाढणार असल्याची पुष्टीही मंत्री थोरात यांनी जोडली.

यावेळी गणपत सांगळे, संतोष हासे, भाऊसाहेब कुटे, नवनाथ अरगडे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, सुनीता अभंग, अशोक थोरात यांसह बाजार समितीचे संचालक सोमनाथ सोनवणे, मारुती कवडे, गंगाधर जायभाये, दादासाहेब देशमुख, सुधीर वाघमारे, उबेद शेख, भारत मुंगसे, अरुण वाघ, दिनकर चत्तर, अवधूत आहेर, आनंद गाडेकर, रमेश आहेर, महेंद्र गुंजाळ, नीलेश थोरात, उपविभागीय अधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, सुरेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर. आर. पाटील, सहकार उपनिबंधक पुरी, प्राचार्य भाऊसाहेब शिंदे, प्रा. बाबा खरात, शेखर ओहोळ, महेश वाकचौरे, साहेबराव गडाख, सुभाष सांगळे, हौशीराम सोनवणे, सोमेश्वर दिवटे, विष्णूपंत रहाटळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सभापती शंकर खेमनर यांनी केले तर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी आभार मानले.

Visits: 9 Today: 1 Total: 117534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *