कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा सज्ज करा ः जिल्हाधिकारी तूर्तास लॉकडाऊन अगर संचारबंदी नसली तरी कडक अंमलबजावणीचे आदेश

नायक वृत्तसेवा, नगर
मराठवाड्याच्या शेजारील जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन अगर संचारबंदीसारखे कडक उपाय अद्याप तरी करण्यात येणार नाहीत. मात्र, कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा पुन्हा सज्ज करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यानुसार करोनाशी सामना करण्यासाठी पूर्वीच्याच उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज होत आहे.

विदर्भ आणि मराठवाडा भागात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन सावध झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या गुरुवारी सायंकाळी सविस्तर आदेश काढला असून विभागवार जबाबदार्‍यांचे वाटपही केले आहे. त्यानुसार सर्व विभागांना आणि अधिकार्‍यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाचा प्रभाव ओसरला म्हणून बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर, विलगीकरण केंद्र आणि अन्य सुविधा पुन्हा अद्ययावत करण्याचा आदेश देण्यात आला आहे, कोणत्याही क्षणी आलेल्या रुग्णांसाठी ही यंत्रणा सज्ज होईल, अशी व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पूर्वी करोना रुग्ण आढळून आला की त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची चाचणी घेतली जात होती. ती पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या परिसरात जास्त संख्येने रुग्ण आढळून आल्यास तेथे प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेंट झोन) करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा खासगी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडे लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या चाचण्या करून घेतल्या जातील, याची दक्षता घेणार आहे. अशी माहिती न कळविणार्‍या डॉक्टरांविरुद्ध कारवाईचा आदेशही देण्यात आला आहे. विविध विक्रेत्यांची तपासणी करणे आणि त्यांना आवश्यक ती दक्षता घेण्यास भाग पाडण्यात येणार आहे. अन्यथा कारवाई करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांमुळे करोनाचा प्रसार वाढत असल्याचे आढळून आल्याने त्यावरील बंधने पुन्हा कडक करण्यात आली आहेत. लग्नासाठी परवानगी घेणे आणि पन्नास जणांचीच उपस्थिती असणे आवश्यक करण्यात आले आहे. अन्यथा गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये, खासगी क्लास येथेही उपाययोजना केल्या जातात की नाही, यावर लक्ष ठेवण्याचा आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आला आहे. हॉटेल पन्नास टक्के क्षमतेनेच सुरू ठेवता येणार आहेत. बस, रेल्वे आणि अन्य वाहनांत परवानगीपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक होणार नाही, यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मास्क न वापरणार्‍यांविरूद्ध कडक कारवाईचा आदेशही देण्यात आला आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पूर्वी जशी दक्षता आणि कारवाई केली जात होती, तशीच ती कडक करण्यात येणार आहे. या आदेशाचा भंग करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

जिल्ह्यात नव्याने करोनाबाधित होणार्‍यांची संख्या वाढत आहे. गेल्या महिन्यात शंभरच्या आत आलेली संख्या आता पुन्हा लक्षणीयरित्या वाढली आहे. खासगी रुग्णालयांतही दहा टक्के रुग्णसंख्या वाढली असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात बुधवारी 145 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर नवीन 114 रुग्णांची भर पडली. विविध रुग्णालयांत 821 जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 71 हजार 939 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.37 टक्के आहे. आकडे वाढत असल्याने प्रशासन सावध झाले आहे.

Visits: 119 Today: 3 Total: 1108907

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *