प्रशांत गडाख यांचा हळवेपणा पुन्हा एकदा अधोरेखित… मित्राच्या निधनाबद्दल सोशल मीडियातून व्यक्त केल्या भावना..

नायक वृत्तसेवा, नेवासा
राजकारणापेक्षा समाजकारणाला नेहमी प्राधान्य देणारे गडाख कुटुंब व त्यांचा साधेपणा नेहमीच सर्वसामान्य माणसाला भावला आहे. जनमाणसांतील नेता म्हणून या कुटुंबाकडे पाहिले जाते. प्रत्येक माणसाला ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजतात. पिढ्या न् पिढ्यांपासून जपलेली माणुसकीची नाती यामुळेच गडाख कुटुंबियांचा वेगळेपणाचा ठसा अधोरेखित होत आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा वारसा प्रशांत गडाख हे जपत आहेत. त्यांचे कार्यकर्ते विचाराने झपाटलेले असतात. कोणतेही सामाजिक काम आपल्याच घरचं कार्य असल्यासारखं ते हिरीरीने करतात. त्यात कुठला लोभ नि कुठला स्वार्थ. जे करायचं ते दुसर्‍यांसाठी. असे शेकडो, हजारो कार्यकर्ते यशवंत सामाजिक प्रतिष्ठानसोबत जोडले आहेत. या परिवारात नुकतीच दुःखाची घटना घडली. आणि प्रशांत पाटील यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. भावूक झालेल्या गडाख यांनी आपल्या मित्राबद्दल सोशल मीडियातून भावना व्यक्त केल्या. त्या जशाच्या तशा…

संदीप शानदार गेलास तु… संदीप नियती तुला आमच्यापासून कायमचचं घेवून गेली. तुझं आयुष्य तेवढंच होतं. खरंतर तुझ्या मागे कोणीच नाही. म्हणजे ना आई वडील, ना बायको, ना मुलं, तु एकटाचं. पण तु गेल्यानं हजारोंच्या डोळ्यात अश्रू आणलेत, हीच तुझी संपत्ती. मी सोनईत येवून सामाजिक कार्य सुरू केलं, तेव्हा तु उदय पालवे सोबत दिसायचा, माझ्या सामाजिक कार्यात तु पुढे न येता मागे राहत राबायचा. मी उदयला नेहमी म्हणायचो, अरे संदीपचं काय? पण उदयने तुला मित्रासारखं, लहान भावासारखं, अगदी मुलासारखं सांभाळलं.
एकदा कुठलं इलेक्शन होत माहित नाही, पण थोडे वाद झाले आणि तुला एकाने गडाख साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केलेली सहन झाली नाही आणि तुझा राग अनावर झाला. आता त्याला आम्ही जावून झोडुन काढतो असं मला म्हणत होता. मी तुला दराडून म्हटलं, संदीप जरा शांत बसं, तु दहा पावलं मागे होतं लगेच शांत.

मी कधीही उदयच्या कँटीनवर गेलो की तु तिथे हजर राहत असतं. मी तुला फक्त काय संदीप, असं म्हणत आणि तु काही नाही भाऊ बसं.. एवढचं आपलं संभाषण. तु चहा आणायचा. कधी कधी मी तुला बस ना संदीप म्हणायचो, पण तु नाही.. नाही.. म्हणत माझ्या मागे काही अंतरावर मी असेपर्यंत तटस्थ उभा असायचा, आज्ञाधारक भावासारखा. मला तुझ्याशी कधी तरी मित्रासारख्या गप्पा माराव्याशा वाटायच्या, पण तु मर्यादेतच राहिला माझा पाठीराखा म्हणून. तु आज आम्हाला रडवतोयस, पण काय शानदार गेलास. हार्टअटॅकने एका क्षणात न कोणाला त्रास न तुलाही त्रास. खरचं असं मरण आलं पाहिजे रे मित्रा. कॉलेजमध्ये उदयच्या कँटीनच्या परीसरात एक झाड मी लावणार आहे आणि ते झाडचं तुझं कुटुंब समजून आम्ही सर्व मित्र तुझ्या स्मृती जिवंत ठेवू, बाकी तु काय ठेवलयं आम्हांला करायला. अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Visits: 107 Today: 1 Total: 1105066

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *