पूरग्रस्तांच्या वेदनांनी व्याकूळ ‘दादा’ वाढदिवशी एकांतात! सोशल माध्यमातून भावनिक आवाहन; उतावळ्या कार्यकर्त्यांकडून मात्र मनस्ताप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पदवीधर मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक तालुक्यांमध्ये सध्या प्रचंड पावसामुळे भयानक स्थिती उद्भवली आहे. गावेच्या गावे अचानक पाण्याखाली गेल्याने हजारो ग्रामस्थांना केवळ अंगावरील कपड्यांसह आपला जीव घेवून पळावे लागले आहे. घरदार, संसार, पिकं, धन-धान्य, गुरंढोरं सारंकाही आस्मानी पावसाने हिरावून नेलं आहे. कालपर्यंत लाखांना पोसणारा पोशिंदाच आज दोन भाकरींसाठी आपल्यासमोर हात पसारुन उभा आहे. शासन त्यांच्या पद्धतीने काम करीतच आहे, मात्र या भयानक संकटातून झालेले नुकसान कधीही भरुन येणारे नाही. अशास्थितीत आलेला वाढदिवस साजरा करणं मनाच्या विरोधातील कृती ठरेल. त्यामुळे शनिवारचा दिवस आपण साध्या पद्धतीने घालवणार असून कोणत्याही प्रत्यक्ष शुभेच्छांपासून दूर राहणार असल्याचे सांगत मित्र परिवार, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी भेटण्यासाठी येण्याचे टाळावे, सोबतच कोणत्याही ठिकाणी, कोणीही फ्लेक्स लावून अथवा कोणताही डामडौल करुन वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करु नये असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे. याबाबत त्यांनी सोशल माध्यमातून भावनिक पोस्टही केली. मात्र त्यांच्या काही अतिउत्साही समर्थकांनी तत्पूर्वीच फ्लेक्सच्या माध्यमातून बसस्थानकाचा परिसर व्यापल्याने सोशल माध्यमात त्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे आवाहनानंतरही मनस्ताप होवून दुपारच्या सुमारास लावलेले ‘ते’ फ्लेक्स काढून घेण्याची वेळही आली.

सध्या महाराष्ट्राच्या मोठ्या भागात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे नद्यांसह ओढ्यानाल्यांच्या क्षमतांपेक्षा कितीतरी अधिक पटीने पाणी वाहू लागल्याने मिळेल तेथून पाण्याचे प्रवाह जमिनी ओलांडीत गावेच्या गावे पाण्याखाली नेत आहेत. धरणांच्या क्षेत्रातही ढगफूटीसदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला गेला, परिणामी अनेक ठिकाणी
मातीचे भराव टाकून केलेले तलावही फुटल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. अचानक कोसळलेल्या या आस्मानी संकटातून जीव घेवून पळताना आयुष्याची शिदोरीही पाठीला सोडावी लागली. दावणीला असलेली जनावरं पाण्यात बुडून मेली, मोकळी चरणारी वाहून गेली. गावच्या गाव पाण्याखाली गेल्याने घरातील सगळ्या चीजवस्तू, भांडीकूंडी, धन-धान्य, सारंकाही मागं राहीलं. धनधान्याने भरलेल्या घराचं, गुराढोरांच्या हंबरड्याने दाटलेल्या गोठ्याचं अक्षरशः मातेरं झालं. कालपर्यंत लाखांना पोसणारा पोशिंदा आज लेकरांसाठी दोन भाकरी मिळाव्यात यासाठी हात पसारुन उभा राहीलायं.

वाढदिवस साजरा करणं मनाला आवडतं नाही, मात्र त्या निमित्ताने कार्यकर्त्यांना, समर्थकांना भेटण्याची संधी मिळते, कार्यकर्त्यांचाही आग्रह असतो, तो टाळता येतं नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही यापूर्वी वाढदिवसाचे कार्यक्रम झाले असतील, मात्र यावेळची स्थिती खूप वेगळी आहे. परतीच्या पावसाने राज्याचा अर्धाभाग उध्वस्थ झाला आहे. अनेक जिल्हे पाण्याखाली असल्याने हजारों लोकांना विस्थापित होवून शासनाच्या आणि मानवी मदतीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. अशावेळी
त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना धीर देण्याची, पुन्हा उभे राहण्यासाठी हिम्मत देण्याची गरज आहे. कार्यकर्ते व समर्थक दोघांचीही इच्छा प्रबळ असली तरीही राज्यातील इतका मोठा भाग आणि तेथील जनता भयानक संकटात असताना वाढदिवसासारखा कार्यक्रम अनावश्यक वाटतो. अशा स्थितीत तो साजरा करणं मनाच्या विरोधातील कृती ठरेल. त्यामुळे शनिवारी (ता.27) आपण एकांतात राहण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी दैनिक नायकशी बोलताना सांगितले.

याबाबत त्यांनी समर्थकांना उद्देशून सोशल पोस्टही केली आहे. त्यात त्यांनी दरवर्षी प्रत्यक्ष व डिजिटल स्वरुपाच्या शुभेच्छांचा उल्लेख करीत वाढदिवस साजरा करणं आपल्या मनाविरुद्ध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह आणि संवादाचे माध्यम या कारणाने यापूर्वी वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. राज्यातील यावेळच्या
परिस्थितीबाबतची व्यथा मांडताना त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांसाठी वाढदिवस हे व्यापक माध्यम असले तरीही त्यातून स्पर्धा निर्माण होते, त्यामुळे त्यापासून अलिप्त रहावे असेच आपले मतं आहे, मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता येत नसल्याची पृष्टीही त्यांनी जोडली आहे. रस्त्यावर कार्यक्रम घेणे, अनधिकृतपणे फ्लेक्स लावणे, त्यातून शहराचे विद्रुपीकरण करणे या गोष्टींना आपला नेहमीच विरोध आहे.त्यातून राजकीय स्पर्धाही वाढीस लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटण्याची अशी संधी राजकीय क्षेत्रातील व्यक्ति सोडत नाही असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

उपाधी दाटणी प्रतिष्ठा गौरव। होय माझा जीव कासावीस॥ या तुकोबारायांच्या ओळींचा संदर्भ देत त्यांनी वाढदिवशी अनेकजण मोठे कष्ट घेवून शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यासाठी त्यांचा पैसा, ऊर्जा, वेळ खर्च होतो, मित्र परिवाराच्या व समर्थकांच्या प्रेमापेक्षा आपणास कोणतीही गोष्ट मोठी नसल्याचे सांगत मित्र परिवाराचा गौरव आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये यासाठी अशा कार्यक्रमांपासून यापुढील काळात ते दूर राहणार असल्याचे संकेतही त्यांच्या सोशल पत्रकातून मिळत आहेत. राज्यातील
आजच्या भयानक स्थितीत आलेल्या वाढदिवसाचे निमित्त साधून आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या मनातील कृतीही प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यांच्या या भावनिक आवाहनानंतरही बसस्थानकावर त्यांच्या काही उत्साही समर्थकांनी फ्लेक्स लावण्याने सोशल माध्यमात त्याची उलट चर्चा सुरु झाली. त्यातून त्यांना मनस्तापाचाही सामना करावा लागला. दुपारनंतर दोन्ही ठिकाणचे फ्लेक्स हटवण्यात आले होते. आमदार तांबे यांनी फ्लेक्सच्या माध्यमातून शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे मान्य करीत एकप्रकारे फ्लेक्स मुक्तीचा संदेश दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

संगमनेरात राजकीय परिवर्तन झाल्यापासूनच सत्ताधारी आणि विरोधक यांच्या समर्थकांमधील राजकीय संघर्ष टोकदार झाला आहे. त्यातच महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या तालुक्यातील विकासकामांच्या श्रेयाची लढाई देखील रंगत असल्याने बसस्थानकाचा परिसर फ्लेक्समय होवून जिल्ह्यातील या सर्वाधीक देखण्या वास्तूचे फ्लेक्सच्या दाटीत वारंवार विद्रुपीकरण होत असल्याने संगमनेरकर नाराज होते. त्यातच फ्लेक्सच्या लढाईतून वारंवार राजकीय संघर्षही उभा राहत असल्याने आमदार सत्यजीत तांबे यांची भूमिका शहरातील फ्लेक्स संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी निर्णयाक ठरु शकते.

