बनावट विवाह करुन तरुणांची फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश! श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी; तीन महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सध्या विवाह करण्यासाठी मुली मिळणे मुश्किल होत आहे. बहुतांशी विवाह हे विवाह जमविणार्या संकेतस्थळावरुन होत आहे. परंतु, त्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे. केवळ हेच नाही तर जमविलेल्या विवाहात देखील असेच होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात बनावट विवाह करुन वराची आर्थिक फसवणूक करणार्या महिलांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील आरोपींमध्ये श्रीरामपूर, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, कोल्हापूर येथील तरुणींसह महिलांचा समावेश आहे. या टोळीने राज्यासह परराज्यातील विवाहेच्छुक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, श्रीरामपूर शहर पोलिसांनी संशयित आरोपी अनिता कदम (रा.दत्तनगर, श्रीरामपूर) हिला पूर्वीच अटक केली होती. सुजाता खैरनार (रा.मालेगाव), ज्योती ब्राह्मणे (रा.दत्तनगर), जयश्री ठोंबरे (रा.कोल्हापूर) यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सध्या पसार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले, शहरातील दत्तनगर येथील केटरिंगच्या कामासाठी मालेगाव येथील विवाहितेला आणले होते. आरोपी अनिता कदम हिने औरंगाबाद येथील मैत्रिणीच्या मदतीने या विवाहितेचा इंदूर (मध्य प्रदेश) येथील एका तरुणाशी पुन्हा विवाह लावला. त्यात संबंधित तरुणास दोन लाख रूपयांना लुटले. हा प्रकार समोर आल्यावर विवाहितेच्या मालेगाव येथील पतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या टोळीने इंदूर, जयपूरसह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथेही बनावट विवाह करून अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले. तपासासाठी पोलिसांनी मध्य प्रदेशकडे धाव घेतली. त्यावेळी संबंधित तरुणी टोळीची सदस्य असून, पैशांसाठी तिने बनावट विवाह केल्याचे समजले. राज्यातील विविध भागांतही टोळी कार्यरत असून, विवाह जमविताना सखोल माहिती घेण्याचे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

असा घालतात गंडा…
विवाहेच्छुक तरुणांचा शोध घेऊन टोळीतील सुंदर तरुणीचे फोटो दाखविले जातात. तरुणाच्या कुटुंबाकडे पैशांची मागणी करीत विवाह साधेपणाने केला जातो. विवाहानंतर काही दिवसांतच वाद निर्माण करून पैशांसह सोन्याचे दागिने घेऊन ही नववधू पसार होते. समाजातील प्रतिष्ठेपोटी पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामळे पोलिसांनाच अशा घटनांत फिर्यादी व्हावे लागत आहे.
