भटके विमुक्त वर्गातील आरक्षणाबाबतचे प्रतिज्ञापत्र मागे घ्या! संगमनेर भाजप भटके विमुक्त जाती-जमाती आघाडीची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भटके विमुक्त जाती-जमाती वर्गातील कर्मचारी व अधिकार्यांचे पदोन्नतीमधील आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र तत्काळ मागे घ्यावे. आणि हे आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे अशा आशयाचे निवेदन संगमनेर भाजप भटके विमुक्त जाती-जमाती आघाडीच्यावतीने मंगळवारी (ता.12) प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने भटके विमुक्त जाती-जमाती वर्गातील कर्मचारी व अधिकार्यांचे पदोन्नतीमधील आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयात सरकारी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यातून या वर्गाला आरक्षण देणे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. त्याचा या घटकांवर प्रतिकूल परिणाम होईल. उलट आरक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करावे. आणि इतर मागण्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर भटके विमुक्त जाती-जमाती आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर डॉ. अशोक इथापे, अॅड. श्रीराम गणपुले, अॅड. श्रीराज डेरे, राजेंद्र सांगळे, अरुण शिंदे, गणेश सानप, विनायक थोरात, हरिश्चंद्र चकोर, रोहिदास साबळे, कोंडाजी कडनर, विकास गुळवे, संतोष हांडे आदिंच्या सह्या आहेत.