सध्या भाजपप्रणित राज्यांमध्ये महिला असुरक्षित ः खा. चतुर्वेदी

सध्या भाजपप्रणित राज्यांमध्ये महिला असुरक्षित ः खा. चतुर्वेदी
जयहिंदच्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये केली जोरदार टीका
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशात पन्नास टक्के महिलांचा वाटा असून आज विविध क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. मात्र कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे देशातील 23 टक्के महिला बेरोजगार झाल्या आहेत. महिला ही देशाची ताकद असताना त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या घटना अत्यंत चिंताजनक असून भाजपप्रणित राज्यांमध्ये महिला असुरक्षित असल्याची टीका करत महिला सशक्त झाल्या तरच देशाचे भले होईल अशी भावना शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली आहे.


जयहिंद महिला मंचच्यावतीने आयोजित ‘महिलांचे सशक्तीकरण व आरोग्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यामध्ये नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पद्मश्री कल्पना सरोज, युवा ईबस (स्पेन), वेस्टइंडीज क्रिकेट संघाच्या फायनान्स ऑफिसर पूजा कराचीवाला, लुझुमी किताजाँ (जपान), प्रिया धुमाळ (अमेरिका), सामाजिक कार्यकर्त्या स्मिता सिंगलकर, अभिनेत्री प्रियंका वामन, पल्लवी खैरनार (अमेरिका), डॉ.क्लारिसा (ऑस्ट्रेलिया) आदी महिलांनी सहभाग घेतला. तर द्रोणागिरीतील मुख्य व्यासपीठावर जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.सुधीर तांबे, सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, शिल्पा गुंजाळ आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, भारतामध्ये महिला विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. मात्र आजही 50 टक्के समुदाय असलेल्या महिला असुरक्षित आहेत. महिला सक्षम व सुरक्षित झाल्या तर देश सक्षम व सुरक्षित होईल. गृहिणी घरामध्ये 24 तास काम करतात. परंतु त्यांच्या कामाचे कोणतेही मूल्यमापन होत नाही. या चोवीस तासांच्या कामाबरोबर त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून आजार वाढतात हे अत्यंत चिंताजनक आहे. म्हणून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. हाथरसमध्ये झालेली घटना अत्यंत खेदजनक असून भाजपप्रणित राज्यांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार ही अतिशय चिंताजनक बाब आहे. म्हणून यासाठी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. राजकारणामध्ये महिलांना फक्त 33 टक्के आरक्षण असून आज तेथे 14 टक्के महिला कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांनी अधिकाधिक समाजकारणात सक्रिय व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. या चर्चासत्रात विविध क्षेत्रांतील महिलांनी सहभाग नोंदवत संवाद साधला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गीतांजली शेळके यांनी केले तर उत्कर्षा रुपवते यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *