श्रीरामपूर तालुक्यात धाडसी दरोडा; अडीच लाखांचा ऐवज लंपास परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक ठिकाणच्या चोर्या टळल्या

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर असलेल्या ओम साई पेट्रोल पंपासमोरील नेहे यांच्या घरावर धाडसी दरोडा टाकून चोरट्यांनी जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रारंभी चोरट्यांनी प्रकाश नाईक यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आवाजाने यूवराज नाईक यांना जाग आली. त्यांनी तातडीने घरातील सर्व दिवे लावले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर चाँदनगर येथे प्रवेश केला. स्थानिक नागरिकांनी चोरट्यांना पाहताच पोलिसांना संपर्क केला. पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजामुळे चोरटे तेथून पुढे सरकले.
![]()
त्यानंतर नवले वस्तीवरील दादा कुताळ यांच्या वस्तीवर ते गेले तेथेही लोक जागे असल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा ओम साई पेट्रोल पंपासमोर राहत असलेल्या बाळासाहेब नेहे यांच्या घराकडे वळविला. तेथे त्यांनी पाठीमागील दरवाजाला लाथ मारली. दोन-तीन लाथांत तो लाकडी दरवाजा उघडला गेला. चारजणांनी घरात प्रवेश केला तर एकजण बाहेर पहारा देत होता. घरात बाळासाहेब नेहे व त्यांची पत्नी पुष्पा हे दोघेच होते. त्यांना एका बाजूला बसवून चोरट्यांनी घरात उचकापाचक केली. सोन्याची अंगठी, पोत, गळ्यातील मणीमंगळसूत्र, कानातील झुबे असे चार तोळे दागिने व 57 हजार रुपये रोख घेवून चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत तेथून पोबारा केला.

दरम्यान, पावणे तीन वाजता उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना दादा कुताळ यांनी चोर आल्याचे कळविले. त्यांनी तातडीने ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे संदेश दिला. परंतु तोपर्यंत चोरटे आपले काम फत्ते करुन पळून गेले. घटना घडताच काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कुर्हे वस्तीकडे कुत्री भुंकण्याचा आवाज आल्यामुळे हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, पोपट भोईटे, निखील तमनर, हरीष पानसंबळ हे स त्या दिशेने गेले, परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. काही वेळातच पोलीस निरीक्षक संजय सानप फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. याचबरोबर गुन्हा अन्वेषणचे पथकही घटनास्थळी पोहोचले. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांनाही बोलविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनीही घटनास्थळी भेट दिली.
