निधी संकलनातून मनामनाला रामाशी जोडण्याचा प्रयत्न – स्वामी गोविंददेव गिरीजी अयोध्येतील राष्ट्रमंदिराच्या उभारणीत मालपाणी परिवाराची एक कोटी रुपयांची समिधा..

संगमनेर, प्रतिनिधी
श्रीराम हे आपल्या देशाचे प्राणतत्त्व आहेत. जेथे राम नाही, ते राष्ट्रच नाही. वाल्मीकी रामायणातही रामचंद्रांच्या वनवासाच्या वेळी केलेले वर्णन असेच सांगते. गेली पाच शतके या देशातही राम नव्हता, आता त्या जन्मस्थळी जेव्हा राम विराजमान होतील तेव्हा राष्ट्रही आपोआप उभे राहील. जगात भारता एवढा समृद्ध, निसर्गसंपन्न आणि परंपरा लाभलेला अन्य देश नाही. फक्त या देशाला त्याच्या सत्त्वाची जाणीव करुन देण्याची गरज होती. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधीची कमतरता नव्हती, तर या मंदिराशी मनामनाला जोडण्याचा भाव होता म्हणूनच निधी संकलनाचा उपक्रम राबविला जात असल्याचे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी संगमनेर येथे केले.

संगमनेरचे कर्मयोगी असलेल्या स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची अयोध्येतील श्रीराम जन्मस्थळी उभ्या राहणार्या मंदिराच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संगमनेरकरांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. संगमनेरच्या प्रथम नागरिक, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अशोकराव सराफ, सहसंघचालक सुभाष कोथमिरे, डॉ.संजय व मनिष मालपाणी, निधी संकलन अभियानाचे जिल्हा प्रमुख श्रीकांत नळकांडे, सहप्रमुख ज्ञानेश आकसाळ व दीपक जोंधळे, तालुका प्रमुख विशाल वाकचौरे, सहप्रमुख प्रविण कर्पे व विवेक कोथमिरे, शहर व प्रखंड अभियान प्रमुख गिरीश डागा, कार्यालय प्रमुख प्रशांत जोशी, सहप्रमुख मंगेश सालपे, हिशोब प्रमुख विरेश आडेप, ओकार राठी, प्रचार प्रमुख ज्ञानेश्वर बकरे आणि अन्य सहयोगी संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत स्वामीजींचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलतांना स्वामीजी म्हणाले की, आपल्या देशाचा आत्मविश्वास संपविण्यासाठी परकीय आक्रमकांनी गेली अनेक शतके आक्रमण करुन आपल्या पूर्वजांवर अनन्वीत अत्याचार केले. आपल्या देशातील मंदिरे उध्वस्त करण्यामागेही हेच कारण होते. प्रभु रामचंद्रांच्या जन्मस्थळी विक्रमादित्याने बांधलेले मंदिर जेव्हा बाबराने उध्वस्त तेव्हा भारतीयांनी मोठा संघर्ष केला. आजवर अनेकवेळा तो होत राहीला. अवघ्या तीन एकर जागेसाठी गेली पाच शतके वारंवार झालेल्या संघर्षात तीन लाखांहून अधिकांनी आपले प्राण दिले आहेत. गेल्या 5 ऑगस्टरोजी त्याच जागी मंदिराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भूमीपूजन झाले आणि आपल्या सर्वांच्या मनातून हरपलेला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण झाला.

मानवी जीवनमूल्यांची साकार प्रतिमा असलेल्या श्रीराम मंदिराच्या पहिल्या टप्प्यात प्राकारातील तीन एकर जागेत बांधकाम केले जाईल व त्यानंतर 67 एकर जागेत, जी नंतर वाढवून 108 एकरपर्यंत विकास करण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्वामीजींनी सांगीतले. माझ्या जीवनाचा अध्यात्मिक प्रवास संगमनेरातून सुरु झाल्याचे सांगतांना त्यांनी जून्या आठवणींना उजाळा दिला. संगमनेरात आपल्याला उदंड प्रेरणा, प्रेम आणि सुविधा मिळाल्या. आजचा हा सत्कार माझ्यासाठी सत्कार नसून आपल्या सर्वांच्या शुभकामना आहेत, ज्याचा मला पुढे फार उपयोग होणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात डॉ.संजय मालपाणी यांनी अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर राष्ट्रमंदिर व्हावे यासाठी जेव्हा राष्ट्रीय पातळीवर अशा व्यक्तिचा शोध सुरु झाला, तेव्हा अनेक गुणांनी मंडित असलेले गोविंद’ हे नाव पक्के झाले आणि स्वामीजींची श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ति झाल्याचे सांगीतले. हे मंदिर केवळ मंदिर नसेल तर राष्ट्रचेतनेचे एक प्रतिक असेल. घराघरात राम निर्माण झाला पाहिजे ही प्रेरणा स्वामीजींनी 35 वर्षांपूर्वी गीता परिवाराच्या स्थापनेवेळी आम्हाला दिली होती. श्रीराम मंदिराच्या निर्मितीतून ही प्रेरणा घराघरात पोहोचावी यासाठीच निधी संकलनाचा उपक्रम राबविला गेला असून त्यात प्रत्येक भारतीयाने आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मालपाणी परिवाराच्यावतीने या राष्ट्रमंदिराच्या निर्मितीसाठी मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललितादेवी व श्रीमती सुवर्णा मालपाणी यांच्यासह राजेश, डॉ.संजय, मनिष व गिरीश मालपाणी आणि संगिता, अनुराधा, रचना व सुनिता मालपाणी यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात आला.

विनय गुणे यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन प्रज्ञा म्हाळस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अनंत दिवेकर यांनी तर आभार गिरीश डागा यांनी मानले. या कार्यक्रमाला संगमनेरकरांची मोठी उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमानंतर या मंदिराच्या निर्मितीत आपल्याही समिधा पडाव्यात यासाठी संगमनेरातील रामभक्तांची अक्षरशः रिघ लागली होती. अनेकांनी हजारों रुपयांचा निधी देत या मंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा उचलला. राष्ट्रगीताने या सत्कार सोहळ्याचा समारोप झाला.
अयोध्येतील राष्ट्रमंदिराच्या उभारणीत मालपाणी परिवाराची एक कोटी रुपयांची समिधा..!
सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेल्या मालपाणी परिवाराने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलनातही आपल्या दातृत्त्वाचे दर्शन घडवले. या कार्यात तन-मन-धन समर्पित करीत मालपाणी परिवाराने एक कोटी रुपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजींच्या हाती सोपविला. यावेळी उपस्थित संगमनेरकरांनी उभे राहुन मालपाणी परिवाराच्या दातृत्त्वाला टाळ्यांच्या गजरात सलाम केला. यापूर्वी मालपाणी परिवारातर्फे कोविडशी मुकाबला करणार्या केंद्र आणि राज्य सरकारलाही प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता.

अयोध्येत उभ्या रहात असलेल्या श्रीराम मंदिरासाठी आपलाही हातभार लागावा म्हणून अगदी साफसफाई करणार्या अतिसामान्य नागरिकापासून ते पाच-सहा वर्षांच्या चिमुरड्यांपर्यंत अनेकांची धावपळ काल दिसून आली. अहमदनगरच्या आनंदऋषी रुग्णालयाबाहेरील एका फळविक्रेत्याने स्वामीजींकडे शंभर रुपये देवू केले, तर बेलापूरातील मुस्लिम बांधवांनी सुमारे 45 हजारांचे संकलन केले. सायंकाळी संगमनेरातील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात 1992 च्या कारसेवेत आघाडीवर असलेल्या प्रभावती संत या वृद्ध महिलेने 11 हजार रुपयांची समिधा वाहीली तर दिवसभर बाजारात बसून भाजीविक्रीतून कवडी कवडी गोळा करणार्या शंकुतलाबाई व बिगारी करणार्या पोपट बिडगर यांनी प्रत्येकी 1100 रुपये तर मुक्ता सौरभ म्हाळस या बालिकेने आपला खाऊच्या पैशांचा डबा रिता करीत सहाशे रुपयांचा निधी या राष्ट्रमंदिराच्या उभारणीसाठी अर्पण केला.

