16 जानेवारीला नागपूर राजभवनाला घेराव घालणार ः थोरात कृषी कायदे रद्द करणे आणि इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर जवळपास मागील 45 दिवसांपासून लाखो शेतकरी हाडे गोठवणार्‍या थंडीत ठाण मांडून बसलेत. या आंदोलनात आत्तापर्यंत 60 पेक्षा जास्त शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला असून केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते 16 जानेवारीला नागपूर येथील ‘राजभवन’ला घेराव घालणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना मंत्री थोरात म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार निवडक उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून या सरकारला देशातील गोरगरीब जनता, शेतकरी, कामगार यांचे काही देणे घेणे नाही. केंद्र सरकारने संसदेच्या नियमांना पायदळी तुडवून आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकर्‍यांना उध्वस्त करणारे आहेत. भांडवलदारांच्या हिताचे हे कायदे तात्काळ रद्द करावेत ही शेतकर्‍यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकर्‍यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून निर्दयी केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेची लूट सुरु आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल-डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी 16 जानेवारी रोजी नागपूर येथे आंदोलन केले जाणार आहे.

शेतकर्‍यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरू केला आहे. पेट्रोल डिझेलमध्ये सतत दरवाढ करु नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने 73 वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे 2014 मध्ये पेट्रोलवर असलेली 9.20 रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षांत मोदी सरकारने 32.98 रुपये केली आहे, लिटरमागे 23.78 रुपयांची वाढ म्हणजे तब्बल 258 टक्के वाढ तर डिझेलची मे 2014 मध्ये असलेली 3.46 रुपये एक्साईज ड्युटी आज 31.83 रुपये केली म्हणजे प्रतिलिटर 28.37 रुपये आणि 820 टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे जगात क्रूड ऑईलचे दर 110 डॉलर प्रति बॅरलवरून 50 डॉलर प्रति बॅरल एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे. इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आत्तापर्यंत 19 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे.

शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच उभा राहिला असून 16 जानेवारीला ‘किसान अधिकार दिवस’ पाळत आंदोलन केले जात आहे. भाजपाच्या मनमानी कारभाराला देशातील जनता कंटाळली आहे. लोकशाही मूल्ये व संविधानाला पायदळी तुडवत लहरी कारभार सुरू आहे. काँग्रेस पक्ष या जुलमी सरकारविरोधात याआधीही रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. हे काळे कायदे केंद्र सरकार रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहू, असेही मंत्री थोरात यांनी शेवटी सांगितले.

Visits: 48 Today: 1 Total: 435056

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *