बेलापूरच्या मुस्लीम बांधवांची श्रीराम मंदिरासाठी 44 हजारांची देणगी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्यात आपलाही सहभाग असावा या हेतूने श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लीम बांधवांनी सुमारे 44 हजार 111 रुपयांची देणगी राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी तथा आचार्य किशोर व्यास यांच्याकडे रविवारी (ता.17) सुपूर्द केली.
श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी तथा किशोर व्यास हे बेलापूर या जन्मगावी येणार असल्याची माहिती मुस्लीम बांधवांना मिळाली. त्यानुसार जामा मस्जिदचे मुख्य विश्वस्त जाफर अत्तार, बहोद्दीन सय्यद, अकबर टिन मेकरवाले, हाजी इस्माईल शेख, शफीक बागवान, मुनीर बागवान, मोहसीन सय्यद, गँसुद्दीन शेख, अजीज शेख आदी मुस्लीम बांधवांची तातडीची बैठक बोलविली. बैठकीत राम मंदिराला देणगी देण्याचा विषय घेण्यात आला. सर्व मुस्लीम बांधवांनी तातडीने आपापल्या परीने राम मंदिरासाठी आर्थिक मदत केली. आचार्य व्यास यांचे गावात आगमन होण्यापूर्वी मुस्लीम समाजाने 33 हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर आचार्य व्यास यांचे बेलापूर गावातील जामा मस्जिदमध्ये आगमन होताच मुख्य विश्वस्त जाफर अत्तार, बहोद्दीन सय्यद, हाजी इस्माईल शेख, अकबर टिन मेकरवाले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी आणखी 11 हजार रुपये जमा झाले. अशाप्रकारे मुस्लीम बांधवांच्यावतीने राम मंदिर बांधाकामासाठी सुमारे 44 हजार रुपयांची देणगी आचार्य व्यास यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
राम मंदिराच्या उभारणीत बेलापूरातील मुस्लीम बांधवाचा सहभाग असावा म्हणून आम्ही हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे हाजी इस्माईल शेख म्हणाले. तर एका चांगल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य आम्हा मुस्लीम बांधवांना लाभले. गावाच्यावतीने आणखी मोठी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करु अस अकबर टिन मेकरवाले म्हणाले.