‘धनंजय मुंडे, तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात!’ भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाईंचा घणाघात
नायक वृत्तसेवा, नगर
‘रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर तुम्हाला वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात. हा सत्तेचा माज व दबाव आणून केस मागे घ्यायला लावली हे निंदनीय आहे,’ असा घणाघात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. मात्र यावरून तृप्ती देसाई यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. ‘सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी मोठ्या हिंमतीने अत्याचाराची तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर या प्रकरणाचे राजकारण करण्यास सुरुवात झाली,’ असे सांगतानाच देसाई यांनी पुढे म्हटले आहे की, रेणू शर्मा आणि तिच्या वकिलावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तसेच त्यांना पाठिंबा देणार्यांना देखील धमक्या देणे, ट्रोल करणे, असे प्रकार झाले. या दबावाखाली रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी लागली. त्यामुळे आता हा संदेश राज्यात जात आहे की, जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री तसेच सरकारमध्ये असलेल्या पदाधिकार्यांच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला, तुम्ही जर हिंमतीने पोलीस ठाण्यात गेलात, तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. दबाव आणून, सत्तेचा माज दाखवून, तो प्रयत्न हाणून पाडू, असा संदेश दिला गेला आहे.
मुंडे यांच्यावर जे आरोप झाले, त्याला काहींनी समर्थन दिले. यावरूनच नेमकी मानसिकता आपल्या राज्यात काय आहे, हे लक्षात येते. हे प्रकरण सत्तेचा दाखवून दाबणार्या मंत्र्याचा आज विजय झाला आहे. परंतु रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.