‘अखेर’ शास्त्री चौकातील मृत्यूचा ‘तो’ सापळा काढला! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; वीज कंपनीकडून तातडीने दुरुस्ती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेकडों नागरीक, विद्यार्थी आणि रहिवाशांसह आसपास फिरणार्या मोकाट जनावरांच्या जीवाला सतत घोर लावणार्या वीज वितरण कंपनीच्या शास्त्री चौकातील ‘त्या’ मृत्यूच्या सापळ्याची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक नागरीकांच्या तक्रारीनंतर दैनिक नायकने वीज कंपनीच्या गलथान कारभारावर प्रकाश टाकताना सर्वसामान्यांच्या जीवाला धोका असलेल्या येथील विद्युत रोहित्राच्या उघड्या लोखंडी पेटीकडे लक्ष वेधले होते. त्याची तातडीने दखल घेत वितरण कंपनीने त्या रोहित्राची उघडी पेटी बदलली असून बाह्य बाजूला लोंबकळणार्या विद्युतवाहक वायरीही आतील बाजूस स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे येथील अपघाताची शक्यता आता मावळली आहे. दैनिक नायकने या गंभीर विषयावर वीज कंपनीचे लक्ष वेधून त्यांना उघड्या पेटीची दुरुस्ती करण्यास भाग पाडल्याने परिसरासह संगमनेरकरांकडून समाधान होत आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या अगदी तोंडावरच असलेल्या माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या अर्धाकृती स्मारकाशेजारी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य वीज वितरण कंपनीचे रोहित्र आहे. त्यावरुन बाजारपेठ, माळीवाडा व मेनरोडचा बहुतेक भाग, साळीवाडा, जयप्रकाश रस्ता, कॅप्टन लक्ष्मी चौक, वाल्मीक चौक, जेधे वसाहत अशा गावठाणातील मोठ्या भागाला वीज पुरवठा केला जातो. रस्त्याच्या अगदी कडेलाच असलेल्या या रोहित्रावर लावण्यात आलेल्या लोखंडी पेटीचे दार गेल्या अनेक महिन्यांपूर्वीच अक्षरशः सडून गळून गेले. मात्र त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याने त्यातून विद्युत पुरवठा करणार्या अनेक वायरीही बाहेर पडल्या.

खरेतर हा परिसर अतिशय वर्दळीचा समजला जातो. दररोज वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणारे छोटे-मोठे विद्यार्थी, त्यांचे पालक, देवदर्शनासाठी जाणारे भाविक, परिसरातील रहिवाशी आणि पालिकेत कामानिमित्त येणार्या नागरीकांमुळे या परिसरात नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यातच शहराच्या गावठाण भागात आजही मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा उपद्रव असल्याने व त्यातील बहुतेक जनावरे या परिसरातच फिरत असल्याने लहान मुलांच्या सहज हाताला लागेल इतक्याशा उंचीवर असलेल्या या पेटीला अथवा त्यातील उघड्या वायरींगला एखाद्याचा स्पर्श होवून मोठा अपघात घडण्याची शक्यता कायमच होती.

याबाबत येथील स्थानिकांनी वेळोवेळी रोहित्राच्या दुरुस्तीसाठी येणार्या कर्मचार्यांकडे तक्रारी करुन सदरील पेटीचे आवरण बदलण्याची विनंती केली. मात्र लोकांच्या विनंतीवरुन त्यांची समस्या दूर करतील ते वीज कर्मचारी कसले. या सूत्रानुसार गेली अनेक महिने वारंवार सांगूनही या धोकादायक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे वैतागलेल्या नागरीकांनी याबाबत दैनिक नायक कार्यालयाला माहिती देत विषयाचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर समाजाप्रति असलेली आपली बांधिलकी जोपासताना दैनिक नायकने या गंभीर विषयावर परखड मत व्यक्त करीत वीज कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्यांचे लक्ष या विषयाकडे वळवले.

त्याची तातडीने दखल घेत संगमनेरच्या वीज वितरण कंपनीने पूर्णतः खराब होवून केवळ खांबाच्या आधाराने लटकलेली ‘ती’ लोखंडी पेटी काढून टाकली असून त्याजागी नव्याने दुसरी पेटी बसवण्यात आली आहे. त्याशिवाय या रोहित्राजवळ लोंबकळत असलेल्या सर्व वीज वाहक तारा आणि वायरींगही दुरुस्त करण्यात आली असून सद्यस्थितीत या रोहित्राजवळ एकही वायर लटकताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरीकांना सतत वाटणारी अपघाताची भीती आता दूर झाली असून अनेकांनी दैनिक नायकच्या कार्यालयात फोन करुन येथील समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या परखड भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

संगमनेर शहरातील जुन्या चौकांमध्ये समावेश असलेल्या शास्त्री चौकात गेल्या अनेक वर्षांपासून सदरचे विद्युत रोहित्र असून त्याच्या आसपास सतत मानवी संचार असतो. मात्र असे असतानाही वीज वितरण कंपनीकडून गेली अनेक महिने येथील उघड्या लोखंडी पेटीकडे दुर्लक्ष केले जात होते. स्थानिकांच्या मागणीनंतर दैनिक नायकने या विषयाकडे वीज कंपनीचे लक्ष वेधून त्याची दुरुस्ती घडवून आणली खरी, मात्र आजही शहरातील काही भागात अशाचप्रकारे विद्युत रोहित्राच्या लोखंडी उघड्या पेट्या नागरी जीवानां धोका निर्माण करणार्या आहेत. त्याकडे गांभीर्याने लक्ष देवून वीज कंपनीने नागरीकांना दिलासा देण्याची गरज आहे.

