संगमनेर तालुक्यातील ‘मिनी विधानसभेवर’ थोरात गटाचेच वर्चस्व! मालदाडमध्ये 35 वर्षानंतर सत्ताबदल तर ‘त्या’ चौदा गावातही थोरातांची बरोबरीने टक्कर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणार्‍या व गेल्यावेळी 11 ग्रामपंचायती विखे गटाकडे असणार्‍या संगमनेर तालुक्यातील ‘त्या’ चौदा गावांमधील निकाल अद्यापही पूर्णतः हाती लागलेले नसून दुपारी दोन वाजेपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील गटाने सहा ठिकाणी बाजी मारली होती, तर थोरात गटाने यंदा आणखी एका ठिकाणी मुसंडी मारीत चार ग्रामपंचायतींवर ताबा मिळविला आहे. खळी येथे विखे-थोरात यांची समझौता एक्सप्रेस यशस्वी ठरली आहे. तालुक्यातील उर्वरीत बहुतेक ग्राममपंचायती थोरातांच्याच ताब्यात होत्या, मात्र मंगळापूर येथे महाविकास पॅनेलने मुसंडी मारल्याने थोरात गटाला धक्का बसला आहे. तर मालदाड येथील ग्रामपंचायतीवरील साहेबराव नवले यांची गेल्या 35 वर्षांची सत्ता थोरात गटाने संपुष्टात आणली आहे.


गावकारभार हाकण्यासाठी तालुक्यातील 90 ग्रामपंचातींचे कारभारी निवडण्यासाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 94 पैकी चार ग्रामपंचायतींचे बिनविरोध ठरल्याने उर्वरीत 90 ग्रामपंचातींचा कारभार कोण हाकणार याचे चित्र आज लागलेल्या निकालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये कनोली ग्रामपंचातवर विखे गटाने वर्चस्व राखल्याने थोरात गटाला धक्का बसला आहे. डिग्रस दाढ खुर्द कनोली व प्रतापपूर येथील ग्रामपंचायती विखे गटाने, तर चनेगाव, झरेकाठी व शेडगाव येथे थोरात गटाने बाजी मारली आहे.


संगमनेर खुर्दमध्येही थोरात गट निर्विवाद असून मंंगळापूरात मात्र महाविकास पॅनेलने पाच जागा पटकावल्याने थोरात गटाला धक्का बसला आहे. चंदनापुरी, पळसखेडे व पेमगिरीत मात्र थोरात गटाचे वर्चस्व कायम आहे. चिंचपूरमध्ये जोरदार मुसंडी मारीत थोरात गटाने विखे गटाला जोरदार धक्का दिला असून तब्बल 35 वर्षांनंतर सत्ता काबीज केली आहे. तर मालदाडमध्ये शिवसेना नेते साहेबराव नवले यांची 35 वर्षांची सद्दी थोरातांनी संपुष्टात आणली आहे. मतमोजणीचा वेग फारच संथ असल्याने अद्यापही अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणे बाकी आहे.


अकोले रस्त्यावरील मालपाणी विद्यालयात होत असलेल्या मतमोजणीसाठी आज सकाळपासूनच उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, तालुक्याचे निरीक्षक पांडूरंग पवार, घारगावचे निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह तीनही ठिकाणच्या पोलिसांनी कडक बंदोस्त ठेवला आहे. निकालानंतर गावागावातील विजयी उमेदवारांचा जल्लोश आणि गुलालाची उधळण यामुळे मालपाणी विद्यालयाच्या परिसराला जत्रेचे स्वरुप दिसत आहे.

निवडणूका जाहीर झाल्यापासून संगमनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी केलेल्या सुयोग्य नियोजनाचे पदोपदी दर्शन घडले. या निवडणूकीच्या आजच्या शेवटच्या दिवशी मतमोजणीसाठी मालपाणी विद्यालयाच्या परिसरात त्यांनी केलेल्या नियोजनाचीच अधिक चर्चा असल्याचे पहायला मिळाले. इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती असतांनाही कोठेही गडबड अथवा गोंधळ बघायला मिळाला नाही. विशेष म्हणजे वॉर्डनिहाय उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतदान कक्षात जाताना व पुन्हा बाहेर येतांना दोन स्वतंत्र मार्ग केले गेल्याने मतमोजणी प्रक्रीयेत कोठेही बाधा निर्माण झाली नाही वा कोठेही गोंधळ उडाल्याचेही चित्र दिसले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *