शुभम आवारी भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट’पदी

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील सह्याद्री विद्यालयाचा माजी विद्यार्थी शुभम युवराज आवारी याची भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट’ या श्रेणी एक अधिकारीपदी निवड झाली आहे. यामुळे अकोले तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शुभमला ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (चेन्नई) येथे एक वर्षाचे नियुक्तीपूर्व प्रशिक्षण दिलेे जाणार आहे. आणि 7 जानेवारी, 2021 रोजी प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. त्याचे दहावीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय अहमदनगर, बारावीचे शिक्षण महाराष्ट्र शासन संचालित सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एस.पी.आय.) औरंगाबाद तर पदवीचे शिक्षण सर परशुुुराम भाऊ (एस.पी.) महाविद्यालय पुणे येेेथून पूर्ण केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यू.पी.एस.सी.) घेतलेल्या कम्बाइन्ड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशनमध्ये उत्तीर्ण झाल्यांनतर, संरक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात येणार्या सर्विसेस सिलेक्शन बोर्ड या पाच दिवसीय मुलाखतीमध्ये तो पात्र झाला. आयोगाने प्रकाशित केलेल्या गुणवत्ता यादीत देशात 46 वा क्रमांक त्याने मिळवला आहे. तर संपूर्ण देशातून एकूण 174 जणांची निवड झाली आहे. शुभमला भविष्यात आर्मी एव्हिएशन कोअरमध्ये रुजू होऊन कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनायचे आहे. शुभमचे वडील डॉ.युवराज भाऊराव आवारी हे व्यावसायिक असून आई चित्रा आवारी या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत कार्यरत आहे. त्याच्या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले, अगस्ति सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, उपाध्यक्ष तुकाराम उगले, ब्राह्मणवाडा गावचे सरपंच भारत आरोटे, अशोक आवारी, अहमदनगर जिल्हा बँक अकोले शाखेचे व्यवस्थापक शांताराम धुमाळ आणि कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.

