शिर्डी नगरपंचायत साठवण तलावार करणार सौर ऊर्जानिर्मिती दरमहा पावणेचार लाख रुपयांच्या वीजबिलाची होणार बचत

नायक वृत्तसेवा, शिर्डी
नगरपंचायत मालकीच्या कनकुरी रस्त्यालगत असलेल्या सुमारे 40 एकर जागेवर 580 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावावर 1 हजार 494 सौर ऊर्जा प्रकल्प बसवून त्यामधून जास्तीत जास्त 0.5 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे नगरपंचायतची दरमहा पावणेचार लाख रुपयांची शंभर टक्के वीजबिलाची बचत होणार असून अशाप्रकारे साठवण तलावावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी शिर्डी नगरपंचायतचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या शिर्डी शहरात माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत विविध उपक्रम हाती घेत असून यामध्ये शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्यात यशस्वी झाली आहे. तत्कालीन नगराध्यक्षा योगीता शेळके यांच्या कारकिर्दीत एकदा तर नगराध्यक्षा अर्चना कोते यांच्या कार्यकाळात एकदा असा दोनदा शिर्डी नगरपंचायतीस स्वच्छ शहराचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानंतर विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन सलग तिसर्यांदा पुन्हा माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात नगरपंचायतीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिला आहे. शिर्डी शहराची ओळख आता देशातील स्वच्छ शहरांमध्ये झाल्याने नगरपंचायतच्यावतीने नवनवीन प्रयोग सुरू हाती घेतले आहे.

केंद्र सरकारच्या अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत शिर्डी नगरपंचायतच्या साठवण तलावावर सुमारे 1 हजार 494 सोलर पॅनल बसवून त्यातून 0.5 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार असून नगरपंचायतला महिन्याकाठी येणार्या पावणेचार लाख रुपये वीजबिलाची बचत होणार आहे. तर वर्षाकाठी जवळपास अर्धा कोटी रुपयांची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी अतिरिक्त जागेचा वापर केला नसून तलावावरील जागेच्या किनार्यावर सर्व पॅनल बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे 0.5 मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, नगरपंचायत 0.3 विजेचा वापर करत आहे. यातून शिल्लक राहिलेली 0.2 मेगावॅट वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला विकणार असून त्यातून नगरपंचायतीच्या वीबिलात कपात होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे नगराध्यक्ष गोंदकर यांनी सांगितले.

शिर्डी नगरपंचायतीस महावितरण कंपनीला वीजबिलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्कम भरावी लागते. त्यामुळे भविष्यात नगरपंचायतीच्यावतीने शहरातील पथदिवे व कार्यालयासाठी वापरण्यात येणार्या वीजबिलाची अशाचप्रकारे शंभर टक्के बचत करण्यासाठी साठवण तलावातील पाण्यावर तरंगणारे सोलर पॅनल बसविण्याच्या विचाराधीन असून याबाबतचा प्रस्ताव सादर करुन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
– काकासाहेब डोईफोडे (मुख्याधिकारी-शिर्डी)

