महाविद्यालय विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे ः अ‍ॅड. देशमुख राजूर येथील देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात


नायक वृत्तसेवा, अकोले
आपण ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकतो तेथील संस्कार व मार्गदर्शन हे आपल्या भावी आयुष्यात दिशा देणारे असते. त्याची परतफेड करायची असेल तर मागे वळून पाहिले पाहिजे. याबरोबरच महाविद्यालय विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. मनोहरराव देशमुख यांनी केले.

राजूर येथील अ‍ॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी पालक संघ समिती व माजी विद्यार्थी संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त एम. एल. मुठे हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात सचिव टी. एन. कानवडे यांनीही विचार व्यक्त केले. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाने यापुढील काळात भरीव असा निधी स्थापन करून महाविद्यालयाला मदत करावी असे आवाहन केले. तसेच माजी विद्यार्थी प्रा. नितीन तळपाडे, राहुल भांगरे (शास्त्रज्ञ), कमल देशमुख, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते माजी विद्यार्थी संघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चिमणराव देशमुख, एस. टी. येलमामे, मिलिंद उमराणी, लेंडे सर, लहानू पर्बत, शशिकांत ओहरा, प्रा. विनोद येलमामे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नैपुण्य प्राप्त माजी विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालय व सत्यनिकेतन संस्थेच्यावतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचलन माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा. रोहित मुठे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणेश मैड यांनी केले.

Visits: 21 Today: 1 Total: 114582

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *