शासकीय प्रयोगशाळेच्या अप्राप्त अहवालांमुळे संगमनेरकरांना मोठा दिलासा! संगमनेरातील शनिवारचा आठवडे बाजार ‘अखेर’ महिनाभर बंद ठेेवण्याचे आदेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुवारी जिल्ह्याला रुग्णसंख्येचा मोठा धक्का बसल्यानंतर आज बाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले. मात्र यामागे आज शासकीय प्रयोगशाळांकडून काही तालुक्यातील अहवालच प्रलंबित असल्याचे कारण असल्याचेही समोर आले. असे असतांनाही आजच्या अहवालात अहमदनगर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा व पारनेर या तालुक्यातून 40 पेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. संगमनेरात आज अवघे 33 तर अकोले तालुक्यात 27 रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेरच्या रुग्णसंख्येत आजही भर पडल्याने तालुका आता 8 हजार 176 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. त्यातील 574 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. आज तालुक्यातील 68 रुग्णांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार समजल्या जाणार्‍या संगमनेरच्या शनिवारच्या बाजारालाही मनाई करण्यात आली असून 15 एप्रिलपर्यंत ती कायम राहणार आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांमध्ये कोविडचा विस्फोट झाला होता. जिल्ह्यात कोविड संक्रमणाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच 1 हजार 338 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर आले. त्यातही राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व अकोले तालुक्यातून कोविडच्या जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच या तालुक्यांमध्ये उच्चांकी रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोविड स्थिती चिंताजनक अवस्थेत पोहोचली. रुग्णवाढीचा आलेख असाच वर चढत राहीला तर जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर होतो की काय अशीही स्थिती गुरुवारच्या अहवालातून निर्माण झाली होती. मात्र आत तांत्रिक कारणाने शासकीय प्रयोगशाळेकडून राहाता तालुक्यासह संगमनेर तालुक्यातील संशयीत रुग्णांचे स्राव चाणी अहवालच अप्राप्त असल्याने आजच्या रुग्णसंख्येत आपोआप घट नोंदविली गेली.

जिल्ह्यातील विविध तालुके आणि लष्करी क्षेत्र मिळून आज शासकीय प्रयोगशाळेकडून 205, खासगी प्रयोगशाळेकडून 404 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीतून 220 असे एकूण 829 रुग्ण जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधीक अहमदनगर तालुक्यातील (महापालिका व ग्रामीण) 313, कोपरगाव 89, राहाता 81, श्रीरामपूर 55, नेवासा 52, पारनेर 48, संगमनेर 37, कर्जत 32, राहुरी 30, पाथर्डी 29, अकोले 27, इतर जिल्ह्यातील 11, श्रीगोंदा 10, लष्करी क्षेत्र 9, जामखेड 4 व शेवगाव 2 असे एकूण 829 जण बाधित असल्याचे समोर आले आहे.

संगमनेर तालुक्याच्या नावाखाली आज 37 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात अहमदनगर येथील 53 वर्षीय इसमासह 29 वर्षीय महिला, श्रीरामपूर येथील 31 वर्षीय महिला व पोहेगाव (कोपरगाव) येथील 37 वर्षीय तरुण अशा चौधांचा समावेश आहे. उर्वरीत 33 जणांमध्ये शहरातील 17 तर ग्रामीणभागातील 16 जणांचा समावेश असून, शहरातील चैतन्यनगर मधील 34 वर्षीय तरुण, अभंग मळ्यातील 55 वर्षीय इसम, गोविंदनगर मधील 59 वर्षीय महिला, जंगदंबा सोसायटीतील 27 वर्षीय तरुण, मालदाड रोडवरील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 63 वर्षीय महिला, स्वातंत्र्य चौकातील 40 वर्षीय महिला, निशिगंधा सोसायटीतील 59 वर्षीय महिला, प्रवरा सोसायटीतील 63 वर्षीय महिला, विद्यानगरमधील 42 वर्षीय तरुण व केवळ संगमनेर असा उल्लेख असलेल्या 75, 41, 35 व 23 वर्षीय महिलांसह 50 व 45 वर्षीय इसम आणि 18 वर्षीय तरुण असे एकूण सतराजण बाधित असल्याचे समोर आले आहे.

ग्रामीणभागातील लोहारे येथील 32 वर्षीय तरुण, चिकणी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध, जाखुरी येथील 49 वर्षीय इसम, कोल्हेवाडी येथील 32 वर्षीय तरुण, कालेवाडी (बोटा) येथील 37 वर्षीय तरुण, कोठे खु. येथील 52 वर्षीय इसम, खांडगाव येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 वर्षीय इसम आणि 45 वर्षीय महिला, आश्वी खुर्द मधील 37 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 36 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 37 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 56 वर्षीय इसम आणि गुंजाळवाडीतील 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 8 हजार 176 झाली आहे. त्यातील 574 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. आज तालुक्यातील 68 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

अकोले तालुक्यात आज आढळले 27 रुग्ण..!

आज अकोल्यातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाली. तालुक्यातील स्राव घेतलेल्या संशयीतांपैकी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एक अहवाल शासकीय, चार अहवाल खासगी तर उर्वरीत 22 अहवाल रॅपीड अँटीजेनद्वारा प्राप्त झाले आहेत. त्यात अकोले शहरातील 42 वर्षीय तरुणासह 32 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय तरुणी, अहमदनगर येथील 46 वर्षीय महिला, राजूर येथील 25 वर्षीय तरुण, धामणगाव आवारी येथील 38 वर्षीय तरुण, लिंगदेव येथील 35 वर्षीय तरुण, घाटघर येथील 16 वर्षीय तरुण, विरगाव येथील 62 वर्षीय ज्येष्ठासह 49 वर्षीय इसम, वारंघुशी येथील 63 वर्षीय ज्येष्ठासह 54, 45 व 23 वर्षीय महिला,

केळी रुम्हणवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठासह 41 व 30 वर्षीय तरुण आणि 55 वर्षीय महिला, सावरगाव पाट येथील 48 वर्षीय महिला, कोकणवाडी येथील 17 वर्षीय तरुण, पट्टेवाडी येथील 17 वर्षीय दोघे तरुण, कळस बु. येथील 51 वर्षीय इसम आणि 51 वर्षीय महिला, टाकळी येथील 61 वर्षीय महिला, वाशेरे येथील 30 वर्षीय महिला आणि रुंभोडी येथील 17 वर्षीय तरुण अशा अहमदनगरमधील एकासह 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी तालुक्यातील विक्रमी 74 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज त्यात निम्म्याहून अधिक घट झाली आहे.
जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमणात वाढत असतांना दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आठवडे बाजारांमध्ये गणना होणारा संगमनेरचा शनिवारचा बाजार मात्र अव्याहत सुरु होता. मात्र जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज काढलेल्या आदेशान्वये उद्यापासून 15 एप्रिलपर्यंत संगमनेरसह जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद केले असून पुढील आदेश येईस्तोवर जिल्ह्यात आठवडे बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 30569

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *