अकोले तालुक्यात 52 ग्रामपंचायतींपैकी 11 बिनविरोध 287 जागांसाठी 568 उमेदवार निवडणूक रिंगणात
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, सोमवारी (ता.4) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 1 हजार 132 उमेदवारांपैकी 385 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर 179 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 287 जागांवर 568 उमेदवार आपले भवितव्य अजमावत असून बहुतेक गावांमध्ये दुरंगी तर मेंहदुरीमध्ये तिरंगी लढत होत आहेत.
निवडणुका होणार्या 52 गावांपैकी मोग्रस, शेरणखेल, उंचखडक खु., म्हाळादेवी, मनोहरपूर, वाघापूर, निंब्रळ, चितळवेढे, निळवंडे, कळंब व बहीरवाडी या 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 41 गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये सुगाव खुर्दमध्ये 7 जागा, 25 अर्ज दाखल पैकी 15 उमेदवारांनी माघार घेतली आहे. 3 जागा बिनविरोध तर 7 जण निवडणूक रिंगणात आहेत. आंबडमध्ये 10 जणांची माघार तर 18 जण निवडणूक रिंगणात, कळस बुद्रुक 10 माघार तर 28 रिंगणात, लिंगदेव 9 माघार तर 21 रिंगणात, उंचखडक बुद्रुक 10 माघार तर 16 निवडणूक रिंगणात, ढोकरी 19 माघार तर 18 रिंगणात, धामणगाव आवारी 23 माघार, 25 उमेदवार रिंगणात व 2 बिनविरोध, टाकळी 7 माघार तर 19 उमेदवार रिंगणात, ब्राम्हणवाडा 6 जणांची माघार तर 28 उमेदवार रिंगणात, गणोरे 20 माघार तर 27 उमेदवार रिंगणात, धुमाळवाडी 24 माघार, 16 रिंगणात आणि 4 बिनविरोध, कोतूळ 20 माघार तर 40 उमेदवार रिंगणात, नवलेवाडी 4 माघार, 7 रिंगणात तर 7 बिनविरोध, मेहेंदुरी 12 माघार तर 24 उमेदवार रिंगणात, रुंभोडी 15 माघार, 7 रिंगणात तर 8 बिनविरोध, पिंपळदरी 5 माघार, 4 रिंगणात तर 4 बिनविरोध, वीरगाव 10 माघार, 22 रिंगणात तर 1 बिनविरोध, वाशेरे 11 माघार, 11 रिंगणात तर 1 बिनविरोध, बेलापूर 6 माघार,20 रिंगणात तर 1 बिनविरोध, धामणगाव पाट 4 माघार, 8 रिंगणात तर 4 बिनविरोध, कुंभेफळ 17 माघार, 13 रिंगणात तर 3 बिनविरोध, तांभोळ 1 माघार, 10 रिंगणात तर 4 बिनविरोध अशाप्रकारे 41 ग्रामपंचायतसाठी निवडणुका लागल्या आहेत.
ज्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत तेथे मोठी रंगत पहायला मिळणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. ऑनलाईन प्रक्रिया होती परंतु ही प्रक्रिया शेवटच्या दिवशी ऑफलाईन झाली. सर्वच उमेदवार समर्थक मोठ्या संख्येने तहसील कचेरीत जमा होत होते. दुपारपर्यंत कचेरीला जणू जत्रेचे स्वरूप आले होते. प्रत्येकाची धावपळ बघायला मिळत होती. बोटावर मोजण्या इतक्याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आमदार डॉ.किरण लहामटे यांनी बिनविरोध निवडणूक करणार्या ग्रामपंचायतींना 26 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणाही केली आहे. त्यास 11 गावांनी साथ दिली तर 41 गावांनी त्याकडे पाठ फिरवली.
‘गाव पुढारी विरुद्ध तरुण कार्यकर्ते, सामान्य जनता’ असा सामना गावोगाव रंगणार असे चित्र पहावयास मिळत आहेत. त्यात आजी-माजी आमदार हे किती मोर्चेबांधणी करतात यावरही पुढची सर्व गणिते अवलंबून असणार आहेत. अखेर बिनविरोध पेक्षा सरळ लढत देत प्रस्थापितांविरोधात नवख्यांनी दंड ठोकले आहेत. प्रशासनाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक कामासाठी 1500 कर्मचारी काम करत असून कायदा-सुव्यवस्था राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज संस्था या ग्रामीण विकासाचा पाया असून खेळीमेळीच्या वातावरणात कोणत्याही दबाव व निपक्ष वृत्तीने उमेदवारांनी निवडणुकीला सामोरे जाऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे.