कसायांनी लढवली नवी शक्कल! आता दुधाच्या गाडीतून गोवंश मांंसाची वाहतूक..! संगमनेर तालुका पोलिसांची भल्या पहाटे हिवरगाव टोल नाक्यावर कारवाई; साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

विकसनशील शहरांच्या पंक्तीत अग्रणी असलेल्या संगमनेरातील गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या शक्कल लढवीत असतात. त्यातूनच टाळेबंदीच्या काळात संगमनेरातील कत्तल खाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या गोवंश मांसासाठी चक्क भाजीपाल्याच्या गाड्यांचा वापरही केला गेला.  मात्र जिल्ह्याच्या सीमांवर तैनात पोलिसांनी कसायांचे मनसुबे धुळीस मिळविले होते. आताही असे बेकायदा उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांनी चक्क ‘दुध’ वाहतुक करणाऱ्या वाहनाचा वापर करीत आपले काळे धंदे पांढरे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र संगमनेर तालुका पोलिसांनी त्यावर कारवाई करीत कसायांचे उद्योग पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहेत.

 याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेरकडून पुण्याकडे निघालेल्या व दूध असे लिहिलेल्या एका आयशर टेम्पोवर (क्र.एम.एच.03/सी.पी.8858) पोलिसांचा संशय बळावला. हिवरगाव टोल नाक्यावर नाकाबंदीवर असलेल्या तालुका पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक गडबडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याच्यावर झडप घालीत त्याला ताब्यात घेतले. यावेळी ‘दूध, असे लिहिलेल्या त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांचे मांस असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सदरचा टेम्पो व त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन टेम्पोतील गोवंश मांंसाची मोजदाद केली असता ते सुमारे चार हजार किलो भरले.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी पोलीस नाईक यमना जाधव यांच्या फिर्यादीवरून सदर वाहनाचा चालक नाथा मनोहर रसाळ (वय 42 रा. कुर्ला झोपडपट्टी, मुंबई) याच्याविरोधात भा.द.वि. कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम 5 (क) 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर वाहन चालकाकडे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सदरचे गोवंशाचे मांंस त्याने मालेगाव (जिल्हा नाशिक) येथून आणल्याचे सांगितले आहे. मात्र पोलिसांना त्यावर विश्वास नसल्याने त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली जाणार असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दैनिक नायकशी बोलताना दिली.

गेल्या दहा महिन्यांपासून संपूर्ण देशात कोविडचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून पर्यंत संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली होती. ही टाळेबंदी उठल्यानंतर वाहतुकीला परवानगी मिळताच संगमनेरातील अवैध कत्तलखान्यामधून मुंबईकडे चक्क भाजीपाल्याच्या वाहनांमधून गोवंशाचे मांस पाठविले जाऊ लागले. मात्र जिल्ह्याच्या सीमांंवर तैनात असलेल्या पोलिसांनी संगमनेरातील कसायांचे मनसुबे उधळून लावले होते. त्यानंतरच्या कालावधीतही पोलिसांनी येथील कत्तलखान्यांंवर वारंवार कारवाई केल्याने कत्तलखाना चालकांचे कंबरडे मोडले होते. त्यातच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच शहरातील सर्व कत्तलखाना चालकांना आपापले उद्योग बंद ठेवण्याचे सक्त फर्मान काढल्याने ते असेपर्यंत येथील कत्तलखाने कडेकोट बंद होते. मात्र शहर पोलिस ठाण्यातील बापूसाहेब देशमुख या लाचखोरावर एसीबीची कारवाई झाल्याने पो.नि. देशमुख यांना चौकशीकामी मुख्यालयाचे निमंत्रण आल्याने गेल्या दहा-बारा दिवसांपासून बंद असलेले कत्तलखाने टप्प्याटप्प्याने सुरू झाल्याचे बोलले जात आहे. आजच्या कारवाईने त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

हिवरगाव टोल नाक्यावर दूध असे लिहिलेला आयशर कंपनीचा टेम्पो तालुका पोलिसांनी पकडला आहे. सदर वाहनांमध्ये चार हजार किलो गोवंशाचे मांंस आढळून आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली जाणार आहे. सदर वाहनचालकाने हे मांस मालेगाव येथून आणल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे, मात्र पोलिस त्याची पडताळणी करीत आहेत.

पांडुरंग पवार

पोलीस निरीक्षक, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन

Visits: 207 Today: 3 Total: 1103567

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *