राष्ट्रीय स्केटींग व बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे सुयश!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोवा येथे झालेल्या पाचव्या राष्ट्रीय युवा क्रीडा चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सात सुवर्ण पदकांसह 11 पदके मिळविली आहेत. भारत सरकारच्या खेलो इंडिया अभियानातंर्गत आंतरराष्ट्रीय युवा क्रीडा व शिक्षण विभागाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत स्केटींग आणि बॅडमिंटनमध्ये ध्रुवच्या खेळाडूंनी नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करताना हे यश संपादन केले.
या स्पर्धेत दहा वर्षांखालील मुलांच्या गटात स्केटींग इनलाईन प्रकारात स्केटींग रिंक एक आणि दोन या दोन्हींमध्ये सोहम संतोष मेहेर आणि सर्वेश भाऊसाहेब जाधव यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करतांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. तर मुलींच्या गटात क्वॉड स्केटींग प्रकारात गुंजन गजानन जोशी या विद्यार्थीनीने सुवर्ण पदक मिळविले. बॅडमिंटनच्या एकेरी प्रकारात धु्रव ग्लोबलच्या हर्ष गणेश काजळेने सुवर्ण तर सार्थक राजगोपाल उपाध्ये याने रौप्य पदकाची कमाई केली. बॅडमिंटनच्या दुहेरी प्रकारातही यशाची पताका फडकावताना हर्ष काजळे व सार्थक उपाध्ये या जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली. या स्पर्धेत नेत्रदीपक प्रदर्शन करणार्या खेळाडूंना पदक आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ध्रुव ग्लोबलच्या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्केटींगचे प्रशिक्षक ज्ञानेश्वर भोत आणि बॅडमिंटनचे प्रशिक्षक प्रशांत भंडारी यांनी ध्रुवच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा प्रमुख गिरीश टोकसे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.